पाय तोडले, गळा चिरला..; ‘क्राइम पॅट्रोल’ फेम अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
'क्राइम पॅट्रोल' फेम अभिनेत्री सपना सिंहच्या 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचे पाय तोडले आणि गळा चिरला.. असा आरोप सपनाने केला आहे. याप्रकरणी तिच्या मुलाच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
‘क्राइम पॅट्रोल’, ‘भाभीजी घर पर है’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सपना सिंहचा 14 वर्षांचा मुलगा सागर गंगवार याची बरेलीमध्ये हत्या करण्यात आली. सागरच्या दोन मित्रांनीच त्याची हत्या केल्याच आरोप आहे. मुलाच्या हत्येविषयी बातमी समजली तेव्हा सपना मुंबईत होती. बरेलीतील इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अदलखिया गावाजवळ रविवारी सकाळी सागरचा मृतदेह आढळून आला होता. अनुज आणि सनी या त्याच्या दोन मित्रांनी पोलिसांच्या चौकशीदरम्यान कबूल केलं की त्यांनी सागरसोबत ड्रग्ज आणि दारुचं सेवन केलं होतं, ज्यामुळे तो कोसळला होता. सपनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सागरच्या कथित हत्येचा धक्कादायक तपशील शेअर केला आहे. सपनाने तिच्या मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.
सागर गंगवार हा आठवीत शिकत होता. तो बरेलीतील आनंद विहार कॉलनत त्याचे मामा ओमप्रकाश यांच्याकडे राहत होता. रविवारी सकाळी अदलखिया गावाजवळ सागरचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हे अज्ञात प्रकरण मानून पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला. मात्र बारादरी पोलिसांनी शनिवारी 7 डिसेंबर रोजी ओमप्रकाश यांच्या माहितीवरून सागरच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सागरच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधअये अनुज आणि सनी हे दोघं सागरला ओढून नेत असल्याचं दिसून आलं. यामुळे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सपनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला आहे की तिच्या मुलाचे त्यांनी पाय तोडले आणि त्याचा गळा चिरला. क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गुन्हेगारांनी त्याला घरातून नेलं आणि त्याच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या, असा आरोप सपनाने केला आहे. सागरच्या मृत्यूमुळे तिचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाल्याचं तिने म्हटलंय.
आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलं?
“सागरचे दोन प्रौढ मित्र अनुज आणि सनी यांना बुधवारी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांना तुरुंगात पाठवलं गेलंय. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. परंतु विषबाधा किंवा ड्रग्जच्या ओव्हरडोजचे संकेत मिळाले आहेत. पुढील तपासणीसाठी व्हिसेराचे नमुने जतन करण्यात आले आहेत,” अशी माहिती फतेहपूरचे सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम यांनी दिली. या घटनेप्रकरणी सागरच्या गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत रास्ता रोको केला. त्याचप्रमाणे त्यांनी दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमची मागणी केली आहे. याप्रकरणी नव्याने एफआयआर दाखल करण्याची मागणी सपनाने केली आहे.