Jawan | ‘जवान’मधल्या छोट्याशा भूमिकेसाठी दीपिकाने किती घेतली फी? स्वत:च केला खुलासा
अभिनेत्री दीपिका पदुकोणने शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दीपिकाची ही भूमिका फार मोठी नसली तरी तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. या भूमिकेसाठी किती मानधन घेतलं, याचा खुलासा खुद्द दीपिकाने केला आहे.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री दीपिका पादुकोणने 2017 मध्ये जेव्हा ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्या चित्रपटात शाहरुख खान तिचा हिरो होता. तेव्हापासूनच ही जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. त्यानंतर शाहरुख खान आणि दीपिकाने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारख्या चित्रपटांमध्येही ही जोडी लोकप्रिय ठरली. या वर्षाच्या सुरुवातीलाच दीपिका-शाहरुखच्या जोडीने ‘पठाण’सारखा सुपरहिट चित्रपट दिला. आता पुन्हा एकदा ‘जवान’ या चित्रपटात दीपिकाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटात दीपिकाची भूमिका छोटीशी होती, मात्र त्यातही तिने विशेष छाप सोडली.
बॉक्स ऑफिसवरील या सर्व यशानंतर शाहरुखसाठी दीपिका ही ‘लकी चार्म’ असल्याचं म्हटलं गेलं. कारण ही जोडी कधीच फ्लॉप ठरत नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे शाहरुखच्या ‘जवान’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी तिने किती मानधन घेतलं याचाही खुलासा दीपिकाने या मुलाखतीत केला.
चित्रपटांमध्ये पाहुणा कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी तू किती मानधन घेतेस असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावर दीपिका म्हणाली, “नाही, मी काहीच मानधन घेत नाही. ’83’ या चित्रपटात मी यासाठी भूमिका साकारली, कारण ती भूमिका अशा महिलांना समर्पित होती जे त्यांच्या पतीच्या यशामागे खंबीरपणे उभ्या राहतात. मी माझ्या आईला ते करताना पाहिलंय. आपल्या पतीच्या करिअरसाठी स्वतःचा त्याग करणाऱ्या पत्नींसाठी माझी ती भूमिका समर्पित होती. त्याशिवाय शाहरुख खानसाठी मला कधीही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी लागली तर मी नेहमीच तयार असते. दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठीही मी हेच म्हणेन.
दीपिका ’83’ आणि ‘सर्कस’ या दोन्ही चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले नव्हते. मात्र ‘जवान’ हा शाहरुखचा चित्रपट सध्या ब्लॉकबस्टर ठरतोय. या चित्रपटाने आतापर्यंत 350 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. “आम्ही दोघं एकमेकांचे लकी चार्म आहोत. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आमच्यातली मैत्री ही लकी चार्मपेक्षाही खूप पुढची आहे.” असं दीपिका म्हणाली.