धनुषच्या मुलाचा बारावीचा निकाल झाला लीक; मिळाले तब्बल इतके गुण
साऊथ सुपरस्टार धनुषच्या मुलाचा बारावीचा निकाल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाने बारावी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याला गणितात सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी येईल, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. अशातच साऊथ सुपरस्टार धनुषचा 18 वर्षीय मुलगा यात्रा राजा याचा निकाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यात्राने एकूण 600 पैकी 569 गुण मिळवल्याचं या रिपोर्ट कार्डमध्ये पहायला मिळतंय. याविषयी अद्याप धनुषकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र सोशल मीडियावर त्याच्या मुलाच्या निकालाची जोरदार चर्चा होत आहे. प्रत्येक विषयात यात्राने खूप चांगले गुण मिळवले आहेत.
यात्रा राजाचा रिपोर्ट कार्ड-
इंग्रजी- 100 पैकी 92 गणित- 100 पैकी 99 भौतिकशास्त्र (फिजिक्स)- 100 पैकी 91 रसायनशास्त्र (केमिस्ट्री)- 100 पैकी 92 जीवशास्त्र (बायोलॉजी)- 100 पैकी 97
यात्रा राजा हा धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा मोठा मुलगा आहे. गेल्या वर्षी हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याने तमिळनाडू पोलीस विभागाने दंड ठोठावल्यानंतर तो चर्चेत आला होता. या दंड वसुलीसाठी पोलीस अधिकारी धनुषच्या घरी गेले होते. धनुष आणि ऐश्वर्याची दोन्ही मुलं यात्रा आणि लिंगा ही चेन्नईमधील एका नामांकित शाळेत शिकत आहेत.
View this post on Instagram
दोन वर्षांपूर्वी ऐश्वर्या आणि धनुषने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी अखेर अधिकृतरित्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली. दोघांना परस्पर संमतीने घटस्फोट हवा असून मुलांची कस्टडी ही प्रामुख्याने ऐश्वर्याला मिळू शकते, असं समजतंय. धनुष आणि ऐश्वर्याने चेन्नईमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट जाहीर केला होता. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला गेला. तेव्हापासून धनुष आणि ऐश्वर्या वेगवेगळेच राहत आहेत.
धनुष आणि ऐश्वर्याने 2004 मध्ये लग्न केलं असून या दोघांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. मुलांच्या कस्टडीबद्दल सूत्रांनी पुढे सांगितलं, “सध्या दोघं मिळून मुलांचा सांभाळ करत आहेत. मात्र मुलांचा प्राथमिक ताबा ऐश्वर्यालाच मिळू शकतो. धनुष त्यासाठी वाद घालणार नाही. पण मुलांना कोणतीही गरज भासल्यास तो त्यांच्यासोबत कायम असेल. सध्या दोघं मिळून त्यांच्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. घटस्फोटाची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून मुलांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं आहे.”