Palak Tiwari | पलक तिवारी खरंच इब्राहिमला करतेय डेट? वडील राजा चौधरीची प्रतिक्रिया चर्चेत
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही अनेकदा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असते. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत तिचं नाव जोडलं जातं. यावर आता तिचे वडील राजा चौधरीने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : गेल्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा अभिनेत्री पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांना एकत्र रेस्टॉरंटबाहेर पाहिलं गेलं, तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये पलकने अनेकदा डेटिंगच्या चर्चांना नाकारलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण पलकचे वडील आणि अभिनेत्री श्वेता तिवारीच्या पूर्वी पतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पलक ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. श्वेता आणि राजाने 1998 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. त्यानंतर श्वेतानेच पलकचा सांभाळ केला. आता घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर पलक आणि राजा यांच्यातील बापलेकीचं नातं हळूहळू सुधारत आहे.
‘टेलीचक्कर’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजाने पलक आणि इब्राहिमच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, “अशा वेळी मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद आपसूकच येते. त्यांना जे चांगलं वाटतंय, त्याबद्दल मी खुश आहे. ती खुश आहे तर मी पण खुश आहे. जर ती निराश असेल तर मी सुद्धा निराश होईन.” यावेळी राजाने पूर्व पत्नी श्वेता तिवारीचंही कौतुक केलं. करिअर सांभाळताना मुलीचंही संगोपन तिने उत्तमरित्या केल्याचं त्याने म्हटलंय.
View this post on Instagram
“यापेक्षा चांगलं संगोपन आणखी कोण करू शकेल? तेसुद्धा काम आणि आईची दुहेरी जबाबदारी पार पाडून मुलीला लहानाचं मोठं करणं सोपं नाही. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. तिने खरंच खूप चांगलं काम केलंय”, असं राजा म्हणाला.
नव्वदच्या दशकात राजा आणि श्वेताने ‘सैय्या हमार हिंदुस्तानी’ या भोजपुरी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं तेव्हा श्वेता 18 आणि राजा 23 वर्षांचा होता. लग्नाच्या काही वर्षांतच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला तेव्हा श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं. श्वेताचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये श्वेता आणि अभिनव विभक्त झाले. या दोघांना रेयांश हा मुलगा आहे.
23 वर्षीय पलकने या वर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती प्रसिद्ध गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली होती. हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं.