TMKOC | मुंबईतील संपत्तीविषयी अखेर ‘जेठालाल’ने सोडलं मौन; स्विमिंग पूलवाला बंगला, महागड्या कारबद्दल म्हणाले..
याच मुलाखतीत दिलीप त्यांच्या करिअरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले. 'हम आपके है कौन' या चित्रपटानंतर करिअरमध्ये फारसा सकारात्मक परिणाम झाला नव्हता, असं ते म्हणाले. यामध्ये त्यांनी रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षितच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेते दिलीप जोशी हे 2008 पासून जेठालालची भूमिका साकारत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेमुळे त्यातील कलाकारांना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाल्या. जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचा मुंबईत बंगला आणि आलिशान गाडी असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. यावर आता खुद्द त्यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप जोशींकडे ऑडी क्यू 7 ही महागडी कार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचसोबत मुंबईत मोठा बंगला त्यांच्या नावे असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही लिहिलं जातंय. युट्यूबवर कसलेही व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. माझ्याकडे ऑडी क्यू 7 ही गाडी असल्याचं ते म्हणतायत. मला पण सांगा जरा की ती गाडी आहे तरी कुठे? मी ती गाडी स्वत: चालवेन. इतकंच नव्हे तर मुंबईत माझा बंगला असून त्यात स्विमिंग पूलसुद्धा असल्याचं म्हटलं गेलंय. जर मुंबईत माझा बंगला असता आणि त्यात स्विमिंग पूल असतं, तर यापेक्षा उत्तम गोष्ट काही होऊच शकत नाही.”
दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यामध्ये त्यांनी घरकाम करणाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘वन टू का फोर’, ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेमुळे त्यांना देशभरात तुफान प्रसिद्धी मिळाली आहे.
View this post on Instagram
याच मुलाखतीत दिलीप त्यांच्या करिअरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटानंतर करिअरमध्ये फारसा सकारात्मक परिणाम झाला नव्हता, असं ते म्हणाले. यामध्ये त्यांनी रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षितच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. सूरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर आपलं पुढील आयुष्य सुरळीत जाईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. “मला वाटलं आता माझी लाईफ सेट आहे. तो चित्रपट आला, हिट झाला तरीसुद्धा मला त्यानंतर काम मिळालं नाही”, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.