“त्यामुळे किसिंग सीन्स बंद करावे लागले”; इमरान हाश्मीने केला खुलासा
अभिनेता इमरान हाश्मीला त्याने साकारलेल्या भूमिकांमुळे आणि बोल्ड दृश्यांमुळे 'सीरिअल किसर'चा टॅग मिळाला. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. ऑनस्क्रीन किसिंग सीनबद्दल पत्नीची काय प्रतिक्रिया होती, याविषयीही त्याने खुलासा केला.
मुंबई : 21 फेब्रुवारी 2024 | अभिनेता इमरान हाश्मी एकेकाळी ‘मर्डर’, ‘अक्सर’, ‘क्रूक’ यांसारख्या चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत असायचा. बॉलिवूडचा ‘सीरिअल किसर’ असा टॅग मिळाल्यानंतर त्याने अशा दृश्यांपासून आणि भूमिकांपासून फारकत घेतली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. चित्रपटांमधील बोल्ड दृश्ये कमी केली तरी काही निर्मात्यांनी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असं तो म्हणाला. चित्रपटांमध्ये किसिंग सीन देणं बंद का केलं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला, “हे माझ्या पत्नीचं मत होतं आणि ते ऐकायचं मी ठरवलं होतं. मी माझ्या कोणत्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन्सचा समावेश केला नाही. किंबहुना मला सुरुवातीपासूनच असे सीन्स करायचे नव्हते. पण माझी एक प्रतिमा बनवली गेली आणि त्याचा अनेक निर्मात्यांनी फायदा उचलला. प्रेक्षकांना खुश करणं हीच मुख्य गोष्ट बनत गेली. जेव्हा मी माझे चित्रपट पाहतो, तेव्हा मला प्रामाणिकपणे असं वाटतं की काही ठिकाणी तशा सीन्सची गरजही नव्हती. चित्रपटासाठी ती मुख्य गोष्ट ठरली आणि मला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.”
View this post on Instagram
ऑनस्क्रीन किसिंग सीन्स केल्यामुळे पत्नीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली का, असा प्रश्न विचारला असता इमरान म्हणाला, “अर्थातच तिच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. पण आता नाहीये कारण आता मी तसे सीन्स करतच नाही.” हे ऐकल्यानंतर जेव्हा त्याला ‘शोटाइम’मधील किसिंग सीनबद्दल विचारलं जातं, तेव्हा तो म्हणतो, “माझ्या पत्नीने अद्याप तो शो पाहिला नाही. त्यामुळे तो पाहिल्यानंतर तिच्या मनाता असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते (हसतो).”
इमरान हाश्मीचा ‘शोटाइम’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा आणि मिहीर देसाई यांनी या शोची निर्मिती केली आहे. मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी या शोचं दिग्दर्शन केलं आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा शो स्ट्रीम होणार आहे.