घटस्फोटानंतर खचली ईशा देओल, आई हेमा मालिनी यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या “प्रेम कधीच..”
अभिनेत्री ईशा देओल गेल्या वर्षी पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली. लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. ईशा आणि भरत एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. घटस्फोटानंतर ईशाचा प्रेमावरून विश्वासच उडाला होता. तेव्हा आई हेमा मालिनी यांनी मोलाचा सल्ला दिला.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने बालमित्र भरत तख्तानीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशा आणि भरत यांनी घटस्फोट घेतला. गेल्या वर्षी हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. त्यांना मिराया आणि राध्या या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आई हेमा मालिनी यांनी तिला कशापद्धतीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहायला आणि प्रेमावरील विश्वास कधीच न गमवायला शिकवलं, याविषयी तिने सांगितलं.
“मला वाटतं की प्रत्येक आईला तिच्या मुलींना, विशेषत: मुलांना ही गोष्ट सांगायची असेल.. हो ते (मुलं) आपोआपच ते करतात पण मुलींसाठी, लग्नानंतरही स्वत:ची ओळख असणं खूप महत्त्वाचं आहे. आईने मला नेहमीच हे सांगितलं आहे की तू खूप मेहनत घेतलंस, स्वत:ची वेगळी ओळख बनवलीस आणि तुझं एक स्वतंत्र प्रोफेशन आहे. जरी तुम्ही नाव कमावलं नसाल तरी तुमच्या हातात काम असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते कधीच थांबवू नकोस. सतत काम करण्याचा प्रयत्न कर. आर्थिकदृष्ट्या नेहमीच स्वावलंबी राहा. तू कोट्यधीशाशी लग्न केलंस तरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणं हे महिला म्हणून तुला खूप अनोखं बनवतं”, असं ईशा म्हणाली.
View this post on Instagram
आईने दिलेल्या शिकवणीबद्दल तिने पुढे सांगितलं, “आणखी एक चांगली गोष्ट तिने मला सांगितली की आपण आयुष्यात अनेक गोष्टी करतो.. काम, स्वत:ची काळजी असं सर्वकाही. पण आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ते कधीच संपू नये.. तो म्हणजे रोमान्स. ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्यात नवचैतन्य संचारतं. ही अशी भावना आहे आणि आपल्या सर्वांना ती हवी असते. आईने दिलेला हा सल्ला अजूनही मला चांगलंच लक्षात आहे. पण फक्त त्यावर मी अजून काम केलं नाही.”
यावेळी ईशा कामातून ब्रेक घेण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. “मी फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबासाठी ब्रेक घेतला होता. मला दोन मुली आहेत. त्यामुळे एक आई म्हणून मला त्यांना पुरेसा वेळ द्यायचा होता. मातृत्व अनुभवण्यासाठी मी हा ब्रेक घेतला होता. मला नेहमीपासून हेच करायचं होतं जे प्रत्येक मुलीला करायचं असतं.. लग्न करणं, मुलांना जन्म घालणं आणि त्यांचं संगोपन करणं. एक आई म्हणून मी माझी भूमिका व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करतेय. मी अभिनेत्री आहे याचा आनंद माझ्या मुलींनाही आहे”, असं ती म्हणाली.