Esha Deol | ‘माझे वडील जुनाट विचारांचे’, धर्मेंद्र यांच्याविषयी ईशा देओल असं का म्हणाली?
2012 मध्ये भरत तख्तानीशी लग्न केल्यानंतर तिने ब्रेक घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत वडील धर्मेंद्र सुरुवातीला संकोच करत होते, याविषयीही तिने सांगितलं.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली. ‘कोई मेरे दिल से पुछे’ या रोमँटिक चित्रपटातून तिने पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत आफताब शिवदासानी आणि संजय कपूर यांच्याही मुख्य भूमिका होत्या. तर पहिल्याच चित्रपटासाठी ईशाने पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर ती ‘ना तुम जानो ना हम’, ‘युवा’, ‘धूम’, ‘काल’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘नो एण्ट्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2012 मध्ये भरत तख्तानीशी लग्न केल्यानंतर तिने ब्रेक घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत वडील धर्मेंद्र सुरुवातीला संकोच करत होते, याविषयीही तिने सांगितलं.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “हे सर्व जुनाट विचारांच्या पंजाबी पुरुषी वृत्तीतून आलं. ते त्यांच्या कुटुंबातील महिलांविषयी फार प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे मला सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार देणं ही त्यांच्या प्रोटेक्टिव्ह स्वभावाचीच एक बाजू होती. ते माझी किती काळजी करतात, हे त्यातून दिसून येतं. त्यात वेगळं काहीच कारण नाही. पण वेळेनुसार ज्या गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात.”
याआधीच्या मुलाखतीतही हेमा मालिनी आणि ईशा देओल हे धर्मेंद्र यांच्या स्वभावाविषयी व्यक्त झाले होते. एका मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, “जेव्हा कधी धर्मेंद्र मुंबई असायचे तेव्हा ते कुटुंबीयांची नक्की भेट घ्यायचे आणि मुलींच्या शिक्षणाविषयी विचारपूस करायचे. मुलींनी नेहमी पंजाबी सूट, कुर्ता-सलवार असेच कपडे परिधान केले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जेव्हा कधी ते घरी भेटायला यायचे तेव्हा मुली कुर्ता-सलवार किंवा पंजाबी सूट घालायच्या.”
याच मुलाखतीत ईशा देओल तिच्या करिअरबद्दल बोलली. “मी घरीच राहावी अशी वडिलांची इच्छा आहे. माझ्याबद्दल ते खूप पोझेसिव्ह आहेत. त्यामुळे मला फार बाहेर जाण्याचीही परवागनी नाही. ते आमच्याबद्दल खूप पोझेसिव्ह आहेत. मुलींनी घरीच राहिलं पाहिजे, पंजाबी ड्रेस घातला पाहिजे असं ते म्हणायचे. आम्हाला बाहेर फार जायची परवानगी नव्हती. पण आईमुळे आम्हाला स्पोर्ट्ससाठी बाहेर पडायला मिळायचं. आम्ही राष्ट्रीय स्तरावरील खेळ खेळण्यासाठी घराबाहेर पडायचो”, असं ती सांगते.