सेटवर उशिरा आल्याने फिरोज खान यांच्याकडून शिक्षा; झीनत अमानच्या पोस्टवर फरदीन खानचं उत्तर
अभिनेत्री झीनत अमान यांनी 'कुर्बानी' या चित्रपटात फिरोज खान यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी फिरोज खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. सेटवर एकेदिवशी उशिरा पोहोचल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे शिक्षा दिली, याविषयी त्यांनी सांगितलं.
मुंबई : 6 जानेवारी 2024 | अभिनेत्री झीनत अमान यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय. झीनत अमान यांनी नुकतंच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे फिरोज खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. सेटवर उशीरा पोहोचल्याने फिरोज खान यांनी पैसे कापल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. त्यावर आता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान याने उत्तर दिलं आहे. फरदीनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी झीनत अमान यांनी फिरोज खान यांच्यासोबत एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी फिरोज खान यांच्याविषयी लिहिलं होतं.
70 च्या दशकात झीनम अमान यांनी फिरोज खान यांच्या चित्रपटातील छोटी भूमिका नाकारली होती. मात्र नंतर ‘कुर्बानी’मधील मुख्य भूमिका त्यांनी स्वीकारली होती. ही आठवण सांगतानाच झीनत यांनी पुढे लिहिलं, ‘मी सेटवर एक तास उशिरा पोहोचले होते. त्यावेळी फिरोज कॅमेरामागे रागात उभे होते आणि मी काही कारण देण्याआधीच त्यांनी माझी फी कापली. बेगम, तुम्हाला खूप उशीर झाला आहे. त्यामुळे मी तुमची फी कापतोय. त्यांनी कोणताच वाद घातला नव्हता किंवा ओरडले नव्हते. पण त्या कापलेल्या फीमधून ते इतर क्रू मेंबर्सना पैसे देणार होते हे नक्की. त्यांच्यासोबत कुर्बानी चित्रपटात काम करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला अनुभव होता.’
झीनत अमान यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. फिरोज खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खान याने आता झीनत अमान यांची पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत त्यावर कमेंट केली आहे. फिरोज खान आज जिवंत असते तर तुमची ही पोस्ट वाचून ते खूप हसले असते, असं त्याने म्हटलंय.
View this post on Instagram
‘झीनम अमान आंटी, तुमच्या या पोस्टवर सहवेदना व्यक्त करायच्या असतील, तर मी सांगू इच्छितो की अशा घटनांना त्यांचे कुटुंबीयसुद्धा अपवाद ठरले नाहीत. आम्हाला फक्त स्टँडर्ड कौटुंबिक 25 टक्के सूट मिळायची. खान साहब यांना तुमची पोस्ट खूप आवडली असती. ते खूप हसले असते,’ असं फरदीनने लिहिलंय. फिरोज खान हे स्टाइल आयकॉन म्हणून ओळखले जायचे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 60 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.