Miss India 2023 | ‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन मिस इंडिया बनली राजस्थानची नंदिनी गुप्ता
नंदिनी गुप्ताने अवघ्या 19 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला आहे. ती मूळची कोटा इथली आहे, जे इंजिनीअरिंग आणि मेडिकल श्रेत्रात शिकणाऱ्यांसाठी देशातील सर्वांत मोठं कोचिंग हब आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
मुंबई : दरवर्षी देशातील असंख्य तरुणी ‘मिस इंडिया’ बनण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या भरपूर मेहनतसुद्धा करतात. मात्र हा किताब प्रत्येकीच्या नशिबात नसतो. यंदा 59 व्या फेमिना मिस इंडियाच्या सौंदर्यस्पर्धेत राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने बाजी मारली. शनिवारी नंदिनीला ‘मिस इंडिया’चा मुकूट सोपविण्यात आला. तिने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर हजरजबाबीपणानेही परीक्षकांची मनं जिंकली. मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पर्धकांना परीक्षकांकडून एक प्रश्न विचारला जातो. जी स्पर्धक या प्रश्नाच्या उत्तराने परीक्षकांना प्रभावित करू शकते, तिच ही स्पर्धा जिंकते. नंदिनीला विचारला गेलेला हा प्रश्न कोणता होता, ते जाणून घेऊयात..
अंतिम फेरीत पोहोचलेल्या सात स्पर्धकांना प्रश्न विचारण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. या प्रश्नाच्या उत्तराद्वारे त्यांचं सामान्यज्ञान, त्यांचा स्वभाव आणि विचारांना पारखलं जातं. अशातच नंदिनीला परीक्षकांनी विचारलं की, “जर तिला पर्याय दिला तर ती काय बदलू इच्छिते?, पहिला पर्याय- जगाला आणि दुसरा पर्याय- स्वत:ला”. त्यावर क्षणाचाही विलंब न करता नंदिनीने उत्तर दिलं.
पहा व्हिडीओ
ती म्हणाली, “मला स्वत:ला बदलायला आवडेल. ज्याप्रकारे मला माझ्या घरातून कौतुक आणि परोपकाराची शिकवण मिळते, त्याचप्रमाणे बदलाची सुरुवात सुद्धा माझ्या घरातूनच होते. जर तुमच्यात स्वत:ला बदलण्याची ताकद असेल तर तुम्ही जग बदलू शकता.” याशिवाय नंदिनीने तिच्या उत्तरात तिच्या नव्या रुपाला स्वीकारण्याबद्दलही सांगितलं. या उत्तराने परीक्षक प्रभावित झाले होते.
कोण आहे नंदिनी गुप्ता?
नंदिनी गुप्ताने अवघ्या 19 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला आहे. ती मूळची कोटा इथली आहे, जे इंजिनीअरिंग आणि मेडिकल श्रेत्रात शिकणाऱ्यांसाठी देशातील सर्वांत मोठं कोचिंग हब आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. ती रतन टाटा यांना सर्वांत प्रभावशाली व्यक्ती मानते. “ते मानवतेसाठी सर्वकाही करतात आणि जे मिळवतात त्यातून बहुतांश रक्कम ते दानधर्मासाठी वापरतात. लाखो लोक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचा आदर करतात”, असं नंदिनीने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेत असल्याचंही ती म्हणाली.