‘नसीरुद्दीन शाह हे ISIS चे समर्थक’; ‘द केरळ स्टोरी’वरून प्रसिद्ध निर्मात्याची सडकून टीका
केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका होत आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविरोधातील वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. “मुस्लिमांविरोधातील द्वेष हा आता जणू फॅशनच बनला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सरकारद्वारे चतुराईने हा द्वेष पसरवला जातोय”, असं ते एका मुलाखतीत म्हणाले. तर “कट्टरता, प्रचारकी आणि दुष्प्रचार पसरवण्यासाठी बनवल्या गेलेल्या चित्रपटांविरोधात लढण्याचा एकमेव मार्ग आहे की कलाकारांनी आपला आवाज उठवला पाहिजे. मात्र असे कलाकार इंडस्ट्रीत फारसे नाहीत”, अशा शब्दांत त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवरही निशाणा साधला. आता प्रसिद्ध निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे. नसीरुद्दीन हे दहशतवाद आणि ISIS चे समर्थक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘द काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी यांसारख्या चित्रपटांचा विरोध करून नसीरुद्दीन शाह यांनी हे सिद्ध केलंय की ते दहशतवाद आणि ISIS (दहशतवादी संघटना) चे समर्थक आहेत.’ आपल्या आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘नसीरुद्दीन शाह हे यशस्वी लोकांचा द्वेष करतात. त्यांनी दिलीप कुमार साहब, शाहरुख खान, विराट कोहली, राजेश खन्ना यांसारख्या प्रतिष्ठित लोकांविरोधात वक्तव्य केलं होतं. म्हणूनच ते विपुल शाह आणि विवेक अग्निहोत्री यांसारख्या निर्मात्यांच्या यशावर चिडले आहेत.’
By opposing #KashmirFiles and #TheKeralaStory #NasseruddinShah proves that he is a terror & ISIS apologists.
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 1, 2023
नसीरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या यशाला एक धोकादायक ट्रेंड असल्याचं म्हटलं होतं. नाझी जर्मनीशी त्यांनी त्याची तुलना केली होती. “एका बाजूला, हा धोकादायक ट्रेंड आहे, त्यात काही शंका नाही. आपण नाझी जर्मनीच्या वाटेवर जात आहोत असं दिसतंय. जिथे हिटलरच्या काळात चित्रपट निर्मात्यांना सहनियुक्त केलं गेलं, तसं करण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकडून ते सर्वोच्च नेत्याची प्रशंसा करणारे चित्रपट बनवतील. त्या सर्वोच्च नेत्याने देशवासियांसाठी काय केलं आणि ज्यू समुदायाचं कशा पद्धतीने खच्चीकरण केलं हे त्यात दाखवू शकतील. जर्मनीतील अनेक मास्टर फिल्ममेकर्स ते ठिकाण सोडून हॉलिवूडला आला आणि तिथे त्यांनी चित्रपट बनवले. इथेही तेच होताना दिसतंय. एकतर उजव्या बाजूला रहा, तटस्थ राहा किंवा प्रस्थापितांच्या बाजूने व्हा”, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
#NasseruddinShah hates successful people . He has spoken against iconic figures like #DilipKumar Sahab , #ShaarukhKhan #ViratKohli , #RajeshKhanna Hence continues to sulk with the success of makers like #VipulAShah & @vivekagnihotri .
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 2, 2023
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका होत आहे.