मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला..; बदलापूर प्रकरणावर कलाकारांचा रोष
बदलापूरच्या घटनेविरोधात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही विकृती आहे असं म्हणत अशा पुरुषांना जगण्याचाही अधिकार नसावा, अशा शब्दांत कलाकारांनी राग व्यक्त केला. प्रिया बापट, प्रसाद ओक, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या कलाकारांनी पोस्ट लिहिल्या आहेत.
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगित अत्याचारप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांचा आक्रोश पहायला मिळाला. असंख्य लोक रस्त्यावर उतरले होते. तर रेल्वे रुळांवर ठिय्या आंदोलन करत त्यांनी काही तास रेल्वेसेवा बंद पाडली होती. कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या घटनेविरोधात आवाज उठवला आहे. ‘माणूस म्हणून नक्की आपण कुठे जातोय’, असा सवाल या कलाकारांनी उपस्थित केला.
प्रिया बापट- माझं रक्त खवळतंय. हे कोणत्याही एका प्रोफेशनबद्दल नाही तर हे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबद्दल आहे.
उत्कर्ष शिंदे- ‘षंढासारखं वागायचं, मेंढरासारखं जगायचं. आपल्या घरात थोडीच झालाय रेप कुणाचा म्हणत आपण फक्त बघ्यासारखं बघायचं.’
अभिजीत केळकर- दे कृत्यच पाशवी, अमानवी आहे.. त्याला शिक्षा तरी मानवी का असावी?
मृण्मयी देशपांडे- माणूस म्हणून नक्की कुठे जातो आहोत आपण?
सुरभी भावे- बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार.. एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग. माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित. त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनासुद्धा करवत नाहीये. कधी अशा आरोपींना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा होईल या देशात देव जाणे
सिद्धार्थ चांदेकर- आता बोला की मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे, म्हणजे कोणीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. त्या लहान पोरींना तर संस्कृती या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. स्कूल युनिफॉर्ममधल्या 3-4 वर्षांच्या मुली आहेत त्या. ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना ‘ह्युमन राइट्स’ नसावेत. कसलाही अधिकार नसावा, जगण्याचाही.
नेमकं काय घडलं?
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये गेल्या आठवड्यात दोन चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शनं केली. बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकांनी ठिय्या आंदोलन केलं. यामुळे बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती.