माधुरीची जुळी बहीण म्हणत दिला ‘अनलकी’ असल्याचा टॅग; नशीब बदलल्यानंतर लागली दिग्दर्शकांची रांग
एका दिग्दर्शकाने सर्वांसमोर तिला मूर्ख म्हणून नाकारलं होतं. मात्र तरीही तिने हार मानली नाही. तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण केली, ज्यामुळे माधुरी दीक्षितसाठी लिहिलेलं गाणंसुद्धा तिच्या नावी झालं होतं.
मुंबई : पहिला चित्रपट बंपर हिट आणि त्यानंतर बॅक-टू-बॅक फ्लॉप चित्रपटांची रांग. फोटोतील या चिमुकल्या मुलीच्या धैर्याची दाद द्यावी लागेल. एका दिग्दर्शकाने सर्वांसमोर तिला मूर्ख म्हणून नाकारलं होतं. मात्र तरीही तिने हार मानली नाही. तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण केली, ज्यामुळे माधुरी दीक्षितसाठी लिहिलेलं गाणंसुद्धा तिच्या नावी झालं होतं. फोटोतील या चिमुकल्या मुलीला अद्याप ओळखू शकला नाहीत, तर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा..’ हे गाणं आठवा. ही मुलगी अभिनेत्री मनीषा कोईराला आहे. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान विधु विनोद चोप्रा यांनी मनीषाला मूर्ख म्हटलं होतं. त्यांना चित्रपटात माधुरी दीक्षितला भूमिका द्यायची होती. तिच्यासाठीच त्यांनी ‘एक लडकी को देखा तो..’ हे गाणंसुद्धा लिहून तयार ठेवलं होतं.
विधु विनोद चोप्रा यांनी जरी मनीषाला नाकारलं असलं तरी नशिबात मात्र काही वेगळंच होतं. तारखा उपलब्ध नसल्यामुळे माधुरीने या चित्रपटाला नकार दिला. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा मनीषाचं ऑडिशन घेतलं. यावेळी तिच्या अभिनयाने ते खूपच प्रभावित झाले आणि माधुरीला विसरून त्यांनी मनीषाला चित्रपटात भूमिका दिली. मनीषा कोइरालाला करिअरच्या सुरुवातीला माधुरी दीक्षितची जुळी बहीण असंही म्हटलं जायचं.
View this post on Instagram
‘सौदागर’ या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मात्र त्यानंतर तीन चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले. त्यामुळे मनीषाला ‘अनलकी’चा टॅग मिळाला होता. मात्र ती इतक्या सहजरित्या हार मानणारी नव्हती. ‘1942 अ लव्ह स्टोरी’नंतर मनीषाने मागे वळून पाहिलं नाही. बॉम्बे, खामोशी : द म्युझिकल, मन, लज्जा यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
मनीषाचं नाव त्याकाळी अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं होतं. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतदेखील तिचं नाव जोडण्यात आलं होतं. अखेर नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत तिने लग्न केलं. 19 जून 2010 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर 2012 मध्ये ते विभक्त झाले. ‘माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेमच नाही आणि हे सत्य मी आता स्वीकारलं आहे’, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. ‘मला पुन्हा निराश करण्याची परवानगी मी कोणाला देणार नही. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य,’ असं ती म्हणाली होती.