Paresh Rawal | बॉसच्या लेकीवरच जडला ‘बाबू भैया’ यांचा जीव; बँकेत नोकरी करत असताना रंगली ‘लव्हस्टोरी’
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी 'या' बँकेत नोकरी करायचे परेश रावल; बॉसच्या लेकीवरच जडला जीव..., अत्यंत खास आहे अभिनेत्यची 'लव्हस्टोरी...', सध्या सर्वत्र परेश रावल यांच्या खासगी आयुष्याची चर्चा
मुंबई : ‘हेरा फेरी’, ‘हेरा फेरी 2’, ‘चुप चुप के’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘ड्रीम गर्ल’, ‘वेलकम’, ‘गोलमाल’, ‘जुदाई’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते परेश रावल यांनी चाहत्यांच्या मनात राज्य केलं. विनोदी भूमिका साकारत चाहत्यांना पोट धरुण हासवणाऱ्या परेश रावल यांनी खलनायकाची भूमिका देखील तितकीच योग्यरित्या पार पाडली. आज देखील परेश रावल स्टारर ‘हेरा फेरी’ सिनेमातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परेश रावल यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, मराठी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. गेल्या ३ दशकांपासून परेश रावल फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. आज परेश रावल यांचा ६८ वा वाढदिवस आहे. तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्याची लव्ह स्टोरी जाणून घेवू.
परेश रावल आज बॉलिवूडमधील फार मोठं नाव आहे, पण एक काळ असा होता जेव्हा परेश रावल यांना सिव्हिल इंजीनियर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परेश रावल नोकरीच्या शोधात घराबाहेर पडले. नोकरी शोधण्यासाठी परेश रावल यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला..
अनेक ठिकाणी मुलाखती दिल्यानंतर परेश रावल यांना ‘बँक ऑफ बडोदा’ या बँकेत नोकरी मिळाली. पण अभिनयात अधिक रस आल्यामुळे परेश रावल यांनी नोकरी सोडली आणि अभिनयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. पण बँकेत नोकरी करत असताना परेश रावल यांचा जीव बॉसच्या मुलीवर जडला. सांगायचं झालं तर परेश रावल यांची लव्हस्टोरी प्रचंड खास आहे.
परेश रावल यांच्या बॉसच्या मुलीचं नाव स्वरूपा संपत असं आहे. बॉसच्या मुलीवर जीव जडल्याची माहिती खु्द्द परेश रावल यांनी एका मुलाखती दरम्यान दिली होती. परेश रावल म्हणाले, ‘त्या काळी माझा मित्र महेंद्र जोशी माझ्यासोबत असायचे. जेव्हा स्वरुपा हिच्याबद्दल मी महेंद्र यांना सांगितलं. तेव्हा ते मला म्हणाले, ती तुझ्या बॉसची मुलगी आहे. पण प्रेमाला कोणती मर्यादा नसते.’
अखेर परेश रावल यांनी १९८७ मध्ये बॉसची मुलगी स्वरूपा संपत यांच्यासोबत लग्न केलं. स्वरूपा संपत आणि परेश रावल यांना दोन मुलं आहेत. परेश रावल कायम त्यांच्या सिनेमांमुळे आणि इतर प्रोफेशल कारणांमुळे चर्चेत असतात. पण खासगी आयुष्याबद्दल परेश रावल फार कमी बोलतात. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या अव्वल स्थानी परेश रावल आहेत.
परेश रावल यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नसीब नी बलिहारी’ या गुजराती सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर परेश रावल यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘होली’ सिनेमातून परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परेश रावल यांनी एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. परेश रावल यांनी गुजराती, हिंदी, तेलुगू आणि मराठी सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.