‘हजवरून परत येताच असं खालच्या पातळीचं काम..’; हिना खानवर नेटकरी नाराज
अभिनेत्री हिना खान नुकतीच हजला उमराह करण्यासाठी गेली होती. तिथून आल्यानंतर एका कार्यक्रमात तिने तोकडे कपडे परिधान केल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. उमराहला या लोकांनी व्हेकेशन बनवून ठेवलंय, असं काहींनी म्हटलंय.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यापासून ती सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. कॅन्सरशी लढा देताना हिना सोशल मीडियाद्वारे अनेकांना प्रेरणा देण्याचंही काम करतेय. आरोग्याच्या इतक्या कठीण समस्येचा सामना करतानाही हिना सतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतेय. परंतु काही नेटकरी अजूनही तिच्यावर नाराज दिसत आहेत. नुकतीच हिना रमजानच्या पवित्र महिन्यात उमराह करण्यासाठी हजला गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यानंतर ती एका कार्यक्रमात पोहोचली. यावेळी रेड कार्पेटवर तिने फोटोसाठी पोझ दिले. याचाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
या कार्यक्रमात हिनाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. किमोथेरपीनंतर हिनाने तिचे सर्व केस गमावले होते. त्यामुळे अनेकदा ती विग लावून कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची. मात्र यावेळी तिने विग न लावण्याचा निर्णय घेतला. तिच्या या अनोख्या लूकने रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याचा व्हिडीओ जेव्हा पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला, तेव्हा त्यावरून काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.




View this post on Instagram
‘या सेलिब्रिटींनी उमराहला व्हेकेशन समजून ठेवलंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘उमराहला गेलीस तरी का? इस्लाम हा थट्टेचा विषय बनवून ठेवला आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘उमराह करून आल्यानंतर पुन्हा तसेच तोकडे कपडे परिधान करू लागली’, अशीही कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकजण हजला उमराह करण्यासाठी जातात. ही इस्लाम धर्मातील खास प्रार्थना समजली जाते. त्यामुळे तिथून आल्यानंतर हिनाने तोकडे कपडे परिधान केल्याने काही नेटकरी नाराज झाले आहेत. या ट्रोलिंगवर अद्याप हिनाने कोणती प्रतिक्रिया दिली नाही.
हिनाला याआधीही अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या टीकेला न घाबरता हिना ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते. त्यामुळे कपड्यांवरून टीका करणाऱ्यांना हिना काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.