प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..
केवळ प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याच्या आरोपांवर अखेर अभिनेत्री हिना खानने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हिनाने उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने टीका करणाऱ्या अभिनेत्रीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री हिना खानवर ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार सुरू आहेत. कॅन्सरचं निदान झाल्यापासून ते उपचारापर्यंतची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहे. मात्र यावरून एका अभिनेत्रीने तिच्यावर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर हिना तिच्या कॅन्सरच्या स्टेजविषयी खोटं बोलल्याचा दावाही या अभिनेत्रीने केला आहे. रोजलिन खान असं या अभिनेत्रीचं नाव आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर हिनाचे मेडिकल रिपोर्ट्स पोस्ट केले आहेत. ‘हिनाला स्टेज 3 नव्हे तर स्टेज 2 च्या कॅन्सरचं निदान झालंय. लवकर निदान झाल्याने तिच्यावर लवकर उपचार सुरू आहे आणि म्हणूनच ती इतक्या लवकर कामावर परतली आहे. खोटं बोलल्याबद्दल तिने सर्वांची माफी मागावी’, अशी मागणी रोजलिनने या पोस्टमध्ये केली होती. रोजलिनच्या या सर्व आरोपांवर अखेर हिनाने मौन सोडलं आहे.
रोजलिनच्या या आरोपांनंतर हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाथरोबमध्ये दिसत असून आरामात ज्युस पिताना दिसतेय. या व्हिडीओवर तिने लिहिलंय, ‘दरम्यान.. मी माझ्या रुममध्ये.. कोणालाही शून्य महत्त्व देण्याचा ‘स्टेज’ एंजॉय करतेय.’ या पोस्टमध्ये हिनाने ‘स्टेज’ या शब्दावर अधिक भर दिला आहे. रोजलिनने हिनाच्या कॅन्सरच्या स्टेजवरूनच टीका केल्याने तिने हे उपरोधिक उत्तर दिलं आहे.




रोजलिनने हिनावर संधीसाधू अशीही टीका केली. “कॅन्सरसाठी 15 तासांची सर्जरी होते. जितकं तिने वाढवून चढवून सांगितलं होतं, तितकं काहीच झालेलं नाही. हिना खानने तिच्या खोटारडेपणासाठी जाहीर माफी मागावी”, अशी मागणी रोजलिनने केली आहे. जून 2024 मध्ये हिनाने तिला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून हिना सोशल मीडियाद्वारे सतत तिच्या उपचाराबद्दलची माहिती देत आहे. त्याचसोबत इतर कॅन्सर पीडितांनाही ती प्रेरणा देतेय. अनेकजण तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. मात्र रोजलिनने तिच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. रोजलिनच्या या आरोपांनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनाच्या मदतीला धावून आली होती. मात्र अंकितावरही रोजलिनने मानहानीचा खटला दाखल केला.