The Kerala Story | “15 जण दररोज तुमच्यावर बलात्कार करत असतील तर..”; पुरावे मागणाऱ्यांना अदा शर्माचा सवाल
यावेळी सुदिप्तो सेन हे केरळ या राज्याविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले. केरळचा एक भाग निसर्गसौंदर्य, कला यांनी परिपूर्ण आहे. तर दुसरा भाग हा दहशतवादाचा नेटवर्क हब बनलाय, असं ते म्हणाले.
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. या चित्रपटातून मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप काहींनी केला. तर केरळमधील 32 हजार महिलांना इस्लाम धर्म स्वीकारून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केल्याच्या निर्मात्यांच्या दाव्यावर काहींनी सवाल उपस्थित केला. या सर्व आरोपांचं स्पष्टीकरण देण्यासाठी चित्रपटाच्या टीमने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन, मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी यांच्यासह केरळमधील 26 पीडित महिलांचीही उपस्थिती होती. यावेळी अदा शर्माने पीडित मुलींच्या आकड्यांचा पुरावा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.
काय म्हणाली अदा शर्मा?
“या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याआधी सुदिप्तो सरांनी मला एक व्हिडीओ दाखवला होता. त्यामध्ये महिला आणि लहान मुलगं एका टँकरमध्ये भरली जात होती. आपण वॉशिंग मशिनमध्ये कपडे जसे कोंबतो, तसं ते माणसांना त्या टँकरमध्ये कोंबत होते. त्या टँकरमधून ते 16 तास प्रवास करायचे. तेसुद्धा काही न खातापिता आणि वॉशरुमला न जाता. एकमेकांवर ते ढकलले जायचे आणि त्यांना श्वास घ्यायलाही जागा नसायची. या टँकरमधून ज्या महिला गेल्या, त्यांचा लेखी रेकॉर्ड काहीच नाही. टँकरमधून जेव्हा त्यांचं बाहेर काढलं जायचं, तेव्हा काहींची हाडं मोडलेली असायची, काही जण बेशुद्ध व्हायचे. ज्या मुली त्यातल्या त्यात ठीक असायच्या, त्यांना गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून ISIS कॅम्पमध्ये ठेवलं जायचं. ज्या लहान मुलांना दुखापत होते, त्यांना तिथेच सोडून दिलं जातं”, असं ती म्हणाली.
आकड्यांच्या आरोपांविषयी अदा पुढे म्हणाली, “आमच्या चित्रपटात एक सीन आहे, जेव्हा निमा केस दाखल करण्यासाठी जाते. तिच्यावर 15 ते 20 जणांनी दररोज बलात्कार केला आणि याबद्दल ते पुरावे मागतात. जर 15 लोकांनी तुमच्यावर महिनाभर सतत बलात्कार केला असेल तर तुम्ही त्याचा पुरावा कसा देणार. शालिनीची प्रेमात फसवणूक झाली, त्यावर केस कशी दाखल करणार? पण मग या गोष्टी घडल्याच नाहीत असं होतं का? बलात्कार झालाच नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता?”
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवघ्या 12 दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 150 कोटींचा आकडा पार केला आहे. रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.