Indian Idol 13 | दत्तक घेतलेल्या मुलाने बदललं आईवडिलांचं नशीब; जाणून घ्या कोण आहे विजेता ऋषी सिंह?
विजेता ठरल्यानंतर ऋषीला 25 लाख रुपये आणि एक मारुती सुझुकी एसयुव्ही कार भेट म्हणून मिळाली. याशिवाय ऋषीसोबत सोनी म्युझिक इंडियाने रेकॉर्डिंगचा करारही केला आहे. ऋषी सिंहने विजेतेपद पटकावलं, तर देवोस्मिता राय फर्स्ट रनर-अप ठरली.
मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अयोध्येच्या ऋषी सिंहने या पर्वाचं विजेतेपद पटकावलं आहे. प्रेक्षकांकडून सर्वाधिक मतं ऋषीला मिळाली आहेत. इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीसोबतच त्याला 25 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. मात्र इथपर्यंतचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. ऋषीने इंडियन आयडॉलच्या मंचावर परफॉर्म केल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितलं होतं की तो त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही. इंडियन आयडॉलच्या थिएटर राऊंडनंतर तो जेव्हा घरी पोहोचला होता, तेव्हा ऋषीला समजलं होतं की त्याच्या आईवडिलांना त्याला दत्तक घेतलं आहे.
याविषयी ऋषी म्हणाला होता, “माझ्या आईवडिलांनी मला दत्तक घेतलंय. पण जर मी त्यांच्यासोबत नसतो, तर आज कदाचित मी या मंचावर पोहोचलो नसतो. मी माझ्या आयुष्यात जितक्या चुका केल्या आहेत, त्यासाठी मी माझ्या आईवडिलांची माफी मागू इच्छितो. मला त्यांच्या रुपात जणू देवच भेटले आहेत. नाहीतर आज मी कुठे असतो याची कल्पनाच मी करू शकत नाही.”
ऋषीला दत्तक घेतल्यानंतर त्याच्या आईवडिलांना अनेकांनी टोमणे मारले. “मला जन्म देणाऱ्या आईने मला सोडून दिलं. मात्र लहानपणी मी जेव्हा आजारी होतो, तेव्हा दत्तक घेतलेल्या या आईने तिची झोप विसरून माझी काळजी घेतली”, असं ऋषीने सांगितलं. मात्र आता ऋषीने इंडियन आयडॉलचं विजेतेपद जिंकून टीकाकारांचं तोंड गप्प केलंय, अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली.
Sab pe chalaake apna jaadu, Rocking Rishi ne jeeta sirf humaara dil hi nahi balki Indian Idol ki ye trophy bhi. A well-deserved contestant of the Indian Idol Season 13.
Congratulations, Rishi! ?✨#IndianIdol13 #IndianIdol #IndianIdolTheDreamFinale pic.twitter.com/M9sEU2Kzx9
— sonytv (@SonyTV) April 2, 2023
ऋषी सिंहने विजेतेपद पटकावलं, तर देवोस्मिता राय फर्स्ट रनर-अप ठरली. याशिवाय चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि सोनाक्षी कर हे स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. विजेता ठरल्यानंतर ऋषीला 25 लाख रुपये आणि एक मारुती सुझुकी एसयुव्ही कार भेट म्हणून मिळाली. याशिवाय ऋषीसोबत सोनी म्युझिक इंडियाने रेकॉर्डिंगचा करारही केला आहे.
गायिका नेहा कक्कर, संगीतकार आणि गायक विशाल ददलानी आणि गायक हिमेश रेशमिया हे तिघे या पर्वाचे परीक्षक होते. तर आदित्य नारायण या शोचा सूत्रसंचालक होता. ऋषी हा उत्तरप्रदेशातील अयोध्येचा असून त्याला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तो देहरादूनमधील हिमगिरी जी युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण करत आहे.