Israel Hamas Conflict : हमास दहशतवाद्यांची मिसाइल पाहून अभिनेत्रीचा उडाला थरकाप; जीव वाचवण्यासाठी काढला पळ
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी मधुराच्या बहीण आणि भावोजींना हमास दहशतवाद्यांनी त्यांच्या मुलांसमोरच ठार केलं होतं. त्यानंतर मधुराने इस्रायलमधल्या परिस्थितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमाल यांच्यादरम्यान सुरू झालेलं युद्ध सातव्या दिवशीही सुरू असून ते लवकर संपुष्टात येईल असं कोणतंही चिन्ह दिसत नाही. गाझा पट्टीत हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य सज्ज होत असल्याचं इस्रायलच्या लष्करातर्फे सांगण्यात आलं. सहाव्या दिवशी युद्धबळींची संख्या किमान 2,500 इतकी झाली आहे. गेल्या शनिवारी हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेट्ससह मोठा हल्ला कला होता. जोपर्यंत इस्रायली लोकांना याबद्दल काही समजलं, तोपर्यंत दहशतवादी सीमा पार करून इस्रायलमध्ये घुसले होते. या युद्धात अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावावं लागतं. ‘नागिन’ या मालिकेत भूमिका साकारलेली टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकने पोस्ट शेअर सांगितलं की इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात तिच्या बहीण आणि भावोजींना मारलं गेलं. मधुराने पाच महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वृत्त माध्यमांतून आणि सोशल मीडियाद्वारे दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यादरम्यान मधुरानेही एक व्हिडीओ शेअर करत तिच्या बहीण आणि भावोजींविषयी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलमध्ये जी परिस्थिती आहे, त्याचा फटका आपल्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर बसल्याचं तिने सांगितलं. मधुराची बहीण आणि भावोजींना 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलांसमोरच मारण्यात आलं होतं. त्यानंतर आता मधुराने शेअर केलेल्या व्हिडीओमधील दृश्य भयानक आहेत.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये मधुरा तिच्या भावोजींसोबत बाहेर रस्त्यावर दिसून येत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा मी 10 मे 2023 रोजी बॉम्ब शेल्टरमध्ये अनेक तास लपल्यानंतर माझ्या भाचीसोबत ताजी हवा घेण्यासाठी पार्कात गेली होती. मात्र लगेचच आम्हाला पुन्हा शेल्टरमध्ये परतावं लागलं होतं कारण आकाशातून मिसाइल्सचा मारा थेट आमच्यावर होऊ लागला होता. युद्ध हे असंच दिसतं. एका लहान मुलाला असं जीवन जगायला मिळावं का? किंबहुना कोणालाही असं आयुष्य मिळावं का? इथे मी पॅलेस्टिनी आणि इस्रायली या दोघांबद्दल बोलतेय. हिंसेनं सुरू झालेल्या युद्धाचा अंत हिंसेनंच संपावं असं नसतं. पण कोणत्याही धर्मातील दहशतवाद हा चुकीचाच आहे. दहशतवाद आणि हिंसा हे कोणत्याही धर्माचं किंवा दैवी कृत्य नाही. विचार करा, ही विचार करण्याची वेळ आहे.’
मधुरा नाईक ही भारतात जन्मलेली यहुदी आहे. मधुराची बहीण ओडाया आणि तिच्या नवऱ्याला हमासच्या दहशतवाद्यांनी ठार मारलं. तेही त्यांच्या दोन मुलांसमोरच. “आज माझं कुटुंब ज्या वेदना आणि त्रासाला सामोरे जातंय ते शब्दात सांगता येणं कठिण आहे. आज इस्रायल संकटात आहे. हमासच्या आगडोंबात लहान मुलं, स्त्रिया आणि म्हातारी माणसं होरपळून निघत आहेत,” असं तिने याआधीच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.