“तिला माझ्याकडून प्रेम हवं होतं पण..”; जॅकलिनसोबतच्या नात्यावर सुकेश चंद्रशेखरचा खुलासा
200 कोटी खंडणी प्रकरणातील आरोपीने पहिल्यांदाच जॅकलिनसोबतच्या नात्याची दिली कबुली
नवी दिल्ली- 200 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या मंडोलीच्या तुरुंगात कैद आहे. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा (Jacqueline Fernandez) अडकली आहे. सुकेशने खंडणीच्या पैशांतून जॅकलिनला महागडे गिफ्ट्स खरेदी केल्याचा आरोप आहे. जॅकलिन आणि सुकेश यांच्यात खूप जवळचं नातं होतं, असंही म्हटलं जातंय. याच कारणांमुळे जॅकलिनची पोलिसांकडून चौकशी झाली. आता सुकेशने मंडोलीच्या तुरुंगातून त्याच्या वकिलासाठी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने जॅकलिन निर्दोष असल्याचं म्हटलंय. पीएमएलए प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवणं दुर्दैवी असल्याचं त्याने म्हटलं आहे.
‘माझ्यावर आता फक्त आरोप करण्यात येत आहेत. त्या आरोपांना कोर्टासमोर पुराव्यांसह सिद्ध करावे लागणार आहेत. या प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवणं दुर्दैवी आहे. आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याच नात्याने मी जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिले होते. यात जॅकलिनचा काय दोष’, असा सवाल सुकेशने त्याच्या चिठ्ठीत केला.
‘जॅकलिनने माझ्याकडून कधीच काही मागितलं नाही. मी तिच्यावर प्रेम करावं आणि नेहमी तिच्यासोबत राहावं, एवढीच तिची अपेक्षा होती. मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून तिला भेटवस्तू दिल्या होत्या. कोर्टासमोर मी या सर्व गोष्टी सिद्ध करेन’, असंही त्याने म्हटलंय.
जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना या प्रकरणात बळजबरीने ओढलं जात असल्याचं कोर्टात सिद्ध करण्याचा निर्धार सुकेशने केला आहे. ‘मला विश्वास आहे की एके दिवशी मी जॅकलिनला त्या सर्व गोष्टी परत देईन, ज्या तिने गमावल्या आहेत. त्याचसोबत मी तिला निर्दोष सिद्ध करेन. माझ्याविरोधात जे काही सुरू आहे, तो राजकीय कट आहे’, असा आरोप सुकेशने त्याच्या चिठ्ठीत केला.
सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आतापर्यंत जॅकलिनची अनेकदा चौकशी झाली. सध्या ती अंतरिम जामिनावर आहे. पतियाळा कोर्टाने जॅकलिनचा अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे.