तो माझ्या आयुष्यात..; सुशिलकुमार शिंदेंच्या नातूबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर?
जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. या दोघांनी माध्यमांसमोर कधीच जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तुझं ‘सपोर्ट सिस्टिम’ कोण आहे, असा प्रश्न विचारला असता तिने क्षणाचाही विलंब न करता शिखरचं नाव घेतलं. “किशोरवयात असल्यापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आमची स्वप्नं एकमेकांना माहित आहेत,” असं ती म्हणाली.
‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला अशा दोन व्यक्तींची नावं विचारली गेली, ज्यांनी तिची स्वप्नं पूर्ण करण्यास साथ दिली. याचं उत्तर देताना आधी जान्हवीने आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, वडील बोनी कपूर यांचं नाव घेतलं. त्यानंतर तिने शिखरविषयी भावना व्यक्त केल्या. “मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा जान्हवीने सारा अली खानसोबत हजेरी लावली, तेव्हा तिने पहिल्यांदा शिखरसोबतच्या नात्याविषयी हिंट दिली. करणच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने शिखरचं नाव घेतलं होतं. या दोघांना अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये किंवा ट्रिपदरम्यान एकत्र पाहिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर एका कार्यक्रमात जान्हवीने शिखरच्या नावाचा नेकलेससुद्धा गळ्यात घातला होता. तर काही दिवसांपूर्वी शिखरच्या आईसोबत ती सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.