जया बच्चन यांच्या आईविषयी मोठी बातमी समोर; रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. इंदिरा भादुरी या 93 वर्षांच्या आहेत.
मुंबई : 7 डिसेंबर 2023 | ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांच्या आईबद्दलची मोठी बातमी समोर येत आहे. जया यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या 93 वर्षांच्या असून हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंदिरा यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचंही कळतंय. इंदिरा यांना हृदयाशी संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर पेसमेकर (pacemaker) सर्जरी पार पडणार आहे.
शस्त्रक्रिया पार पडणार
पेसमेकर हे एक वैद्यकीय उपकरण असतं, जे सर्वसामान्यपणे हृदयाच्या असामान्य ठोक्यांचं व्यवस्थापन आणि नियमन करण्यासाठी वापरलं जातं. पेसमेकर लावण्यामागचं कारण म्हणजे ब्रॅडीकार्डिया. अशा अवस्थेत हृदय खूप मंद गतीने धडधडतं किंवा थांबतं, ज्यामुळे चक्कर येणं, बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसून येतात. इंदिरा यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बच्चन कुटुंबीय एकत्र
संपूर्ण बच्चन कुटुंबीय आणि जया बच्चन यांना नुकतंच ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या खास प्रीमिअरदरम्यान पाहिलं गेलं होतं. या वेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, श्वेता नंदा, नव्या नवेली नंदा यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमातील बच्चन कुटुंबीयांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरसुद्धा इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवत आहेत. 7 डिसेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
जया बच्चन यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, त्या नुकत्याच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेता रणवीर सिंगच्या आजीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत शबाना आझमी, आलिया भट्ट यांच्याही भूमिका होत्या.