वेस्टर्न कपड्यांवरून जया बच्चन यांचं वक्तव्य ऐकून मुलगी श्वेता म्हणाली..
वेस्टर्न कपड्यांवरून जया बच्चन यांचा भारतीय महिलांवर निशाणा; मुलीने दिलं हे उत्तर
मुंबई: अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या नातीच्या पॉडकास्ट मुलाखतीत हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भारतीय महिलांच्या फॅशनबद्दल वक्तव्य केलं. “मला कळत नाही की भारतीय महिला या पाश्चिमात्य (वेस्टर्न) कपडे परिधान करण्यावर का इतकं भर देतात”, असा सवाल त्या नात नव्या नवेली नंदा आणि मुलगी श्वेता बच्चन यांच्यासमोर करतात.
पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये नव्या आणि श्वेता या दोघींना जया प्रश्न विचारतात. “भारतीय महिला या अधिकाधिक वेस्टर्न कपडे का घालत आहेत?” त्यावर उत्तर देताना जया यांची मुलगी श्वेता म्हणते, “सहजतेने वावरता यावं म्हणून वेस्टर्न कपड्यांना प्राधान्य दिलं जातंय. आज बहुतांश महिला या बाहेर कामाला जातात. साडी नेसण्यापेक्षा पँट आणि टी-शर्टवर वावरणं सहजसोपं वाटतं.”
मुलीच्या या उत्तराने समाधान न झालेल्या जया पुढे म्हणतात, “पाश्चिमात्य कपडे किंवा वेस्टर्न पोशाख हे स्त्रीला ‘मॅन-पॉवर’ (पुरुषांची शक्ती) देतात असा नकळत आपला समज झाला आहे. मला एका स्त्रीला स्त्री-शक्तीमध्येच (वुमन पॉवर) पहायला आवडेल. मी असं म्हणत नाही की जा साडी नेस. पण पाश्चिमात्य देशांतही आधी महिला ड्रेस परिधान करायच्या. जेव्हा त्यांनी पँट घालायला सुरुवात केली तेव्हापासून ही संपूर्ण गोष्ट खूप बदलली.”
आईचं मत ऐकल्यानंतर श्वेता पुढे म्हणते, “औद्योगिक क्रांतीच्या काळात हे घडलं. जेव्हा पुरुष युद्धात उतरले, तेव्हा स्त्रिया कारखान्यांमध्ये काम करू लागल्या. तेव्हा अवजड यंत्रांची कामं करताना त्यांना पँट घालावी लागली.”
मायलेकीची ही चर्चा सुरू असताना नव्या साडी नेसणाऱ्या महिला सीईओंबद्दल बोलते. त्यावर जया म्हणतात, “त्यांना स्वत:विषयी आणि स्वत:च्या त्वचेच्या रंगाविषयी न्यूनगंड नसतो म्हणून त्या साडी नेसण्याबाबत कॉन्फीडन्ट असतात.”
नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया यांनी याआधीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल, करिअरबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. त्या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका आहेत.