Manipur | ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होतेय पण देशात..’; मणिपूरच्या घटनेवर जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया
त्या घटनेचा व्हिडीओ 19 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. संपूर्ण देशात मणिपूरमधील घटनेविरोधात रोष असताना त्यावर संसदेत मात्र चर्चा होत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी दिली.
नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेतील कोंडी सोमवारीही फुटू शकली नाही. केंद्र सरकार यावर चर्चेला तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितलं. या उत्तरावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष समाधानी झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सभागृहात निवेदन केलं पाहिजे, या मागणीवर ते ठाम आहेत. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. त्या घटनेचा व्हिडीओ 19 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. संपूर्ण देशात मणिपूरमधील घटनेविरोधात रोष असताना त्यावर संसदेत मात्र चर्चा होत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी दिली.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी त्यावर आणखी काय बोलू शकते? मणिपूरची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होतेय, मात्र आपल्याच देशात होत नाही. हे लज्जास्पद गोष्ट आहे.” जया बच्चन यांच्याआधी अक्षय कुमार, रेणुका शहाणे, आशुतोष राणा, अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, कियारा अडवाणी, विवेक अग्निहोत्री, सोनू सूद, मनोज मुंतशीर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी मणिपूरमधील हिंसेवर संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
मणिपुर के विषय में अंतरराष्ट्रीय स्तर पर चर्चा हो रही है लेकिन हमारे देश में नहीं हो रही… यह शर्म की बात है: सपा सांसद जया बच्चन, दिल्ली pic.twitter.com/1UyH9tnIiN
— ANI_HindiNews (@AHindinews) July 24, 2023
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल्या होत्या, “सैतानी कृत्याने भरलेल्या त्या व्हिडीओला मी पूर्ण पाहू शकले नाही. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर माझी मान शरमेनं खालावली. कोणालाच याची पर्वा नाही की महिलांना किती चुकीची वागणूक दिली जातेय. हा खूपच निराशाजनक व्हिडीओ आहे. दररोज देशातील महिलांसोबत होणाऱ्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.”
लोकसभेत सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे उपनेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेली चर्चेची विनंती विरोधकांनी फेटाळली. तहकुबीनंतर अमित शाह यांनी लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्र सरकार चर्चा करायला तयार आहे. मग विरोधी पक्ष आम्हाला सहकार्य का करत नाहीत, असा प्रश्न विचारला. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीही विरोधी पक्षनेत्यांना मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र अद्याप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तडजोड झालेली नसल्याने संसदेतील कोंडी कायम आहे.