‘तारक मेहता..’मधील जेठालालच्या या डायलॉगवर आणली बंदी; यापुढे म्हणायचं नाही.. दिली सक्त ताकीद
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालालच्या एका डायलॉगवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर या डायलॉगवर बंदी आणली गेली. यापुढे हा डायलॉग मालिकेत दाखवू नका.. अशी सक्त ताकिदच देण्यात आली होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चाललेली मालिका आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. कुटुंबातील सर्व पिढ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या मालिकेतील कलाकार, त्यांचे डायलॉग्स तुफान हिट झाले. परंतु त्यातील एका डायलॉगवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचा तो डायलॉग होता. वादानंतर मालिकेतून या डायलॉगवरच बंदी आणली गेली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द दिलीप जोशी यांनी याबद्दलची माहिती दिली. ते सौरभ पंतच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित होते.
ज्या डायलॉगवरून वाद झाला होता, तो खरंतर मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हताच. दिलीप जोशी यांनी सेटवर तो डायलॉग अचानक म्हटला होता. याविषयी त्यांनी सांगितलं, “मालिकेत माझा एक डायलॉग होता. मी दयाबेनला ‘ए पागल औरत’ असं म्हणतो. सेटवर शूटिंगदरम्यान दयाबेन ज्याप्रकारे वागते, ते पाहून माझ्या तोंडून आपोआप तो डायलॉग निघाला. नंतर त्यावरून काही महिला स्वातंत्र्य मोहीम आणि इतर कोणती मोहीम सुरू झाली आणि मला सांगितलं गेलं की यापुढे तुम्ही हा डायलॉग म्हणणार नाही. ”




जेठालालने दयाबेनला ‘ए पागल औरत’ म्हटलेला हा डायलॉग नंतर इतका गाजला की निर्मात्यांकडे त्याविरोधात असंख्य तक्रारी येऊ लागल्या होत्या. अखेर मालिकेतून त्यांना तो डायलॉग काढावा लागला. तो डायलॉग जरी मस्करीसाठी म्हटला गेला असला तरी अनेक महिलांना तो आक्षेपार्ह वाटल्याचं दिलीप यांनी सांगितलं. आजसुद्धा जेठालालचा हा डायलॉग चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. कारण त्यावरून अनेक मीम्स आणि विनोद सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘तारक मेहता..’ ही मालिका अशाप्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये या मालिकेतील काही कलाकारांनी निर्मात्यांनी पैसे थकवल्याचा आरोप केला होता. काही लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेचा निरोपही घेतला होता. सध्या या मालिकेत दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, अमित भट्ट, सोनालिका जोशी, मुनमुन दत्ता, समय शाह आणि श्याम पाठक यांच्या भूमिका आहेत. जेठालालची पत्नी दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी हिने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. बाळंतपणासाठी तिने हा ब्रेक घेतला होता. परंतु नंतर ती मालिकेत परतलीच नाही. मालिकेत दिशाच्या जागी अद्याप कोणत्याच अभिनेत्रीची निवड झाली नाही.