‘झिम्मा 2’ची छप्परफाड कमाई; वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट
'झिम्मा 2' या चित्रपटाला अगदी पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मुंबई : 20 डिसेंबर 2023 | आनंद एल. राय निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘झिम्मा 2’ हा मराठी चित्रपटसृष्टीत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ यांसारख्या दोन तगड्या हिंदी चित्रपटांशी बॉक्स ऑफिसवर टक्कर असतानाही ‘झिम्मा 2’ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 14 कोटींची कमाई केली आहे. 2023 हे वर्ष ‘झिम्मा 2’मुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरलं आहे. महिलांचं भावविश्व मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा सगळ्यांना भावली आणि जगभरात त्याचं कौतुक झालं.
जवळपास दोन वर्षांपूर्वी ‘झिम्मा’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर आता ‘झिम्मा 2’सुद्धा अपेक्षांवर खरा उतरला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सात मैत्रिणी सहलीवर निघाल्या आहेत आणि या सहलीदरम्यान त्यांच्या आयुष्यातील, महिलांच्या भावविश्वातील अनेक पदर अलगद उलगडले गेले आहेत. ‘झिम्मा 2’मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ट दिसली. सात मैत्रिणी, सात तऱ्हा. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. देहबोली वेगळी आहे. परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम. ‘झिम्मा’ पाहून सहलीला गेलेल्या मैत्रिणी ‘झिम्मा 2’ पाहून दुसऱ्यांदा सहलीचं आयोजन करत आहेत.
View this post on Instagram
झिम्मा 2 या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. त्यांच्या ‘आत्मपॅम्पलेट’ या मराठी चित्रपटाने जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील समृद्ध कथाकथनाची अनोखी बाजू या चित्रपटातून पहायला मिळाली. प्रतिष्ठित बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाची प्रशंसा झाली. ‘गुड लक जेरी’ आणि ‘अॅन अॅक्शन हिरो’सारख्या अलीकडील त्यांच्या यशांसह हा वारसा पुढे चालवत आनंद एल राय यांनी झिम्मा 2’ची निर्मिती केली.