जिमी शेरगिलला केस कापल्याची मिळाली होती मोठी शिक्षा; आईवडिलांनी दीड वर्षापर्यंत धरला अबोला
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी मोजक्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये जिमी शेरगिलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘मोहब्बतें’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘स्पेशल 26’, ‘तनू वेड्स मनू’, ‘अ वेडनस्डे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.
मुंबई : 18 जानेवारी 2024 | अभिनेता जिमी शेरगिलने ‘माचिस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटामुळे तो प्रकाशझोतात आला. या चित्रपटानंतर त्याची प्रतिमा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून निर्माण झाली. जिमीला त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांचे ऑफर्स मिळू लागले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. एकसारख्याच भूमिका करायच्या नाहीत म्हणून त्याने काही निर्मात्यांना साइनिंग रक्कमसुद्धा परत केली होती. या मुलाखतीत जिमी त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही व्यक्त झाला. शीख कुटुंबातील असल्याने केस कापण्याला त्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र जेव्हा जिमीने त्यांच्या विरोधात जाऊन केस कापले, तेव्हा जवळपास दीड वर्षापर्यंत त्याच्या आईवडिलांनी अबोला धरला होता, असं त्याने सांगितलं.
भूमिकांविषयी जिमी म्हणाला, “पहिल्या दोन वर्षांत खूप काम केल्यानंतर मी बऱ्याच निर्मात्यांना त्यांची साइनिंग रक्कम परत केली. कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला चॉकलेट बॉयची प्रतिमा नको होती. अनेकांनी मला प्रश्न विचारला की का असं करतोय? पण माझं मन मला सांगायचं की हे फक्त दोन-तीन वर्षांपर्यंतच चालू शकेल. त्यापुढे नाही. तेव्हा माझ्याकडे मुन्नाभाई, हासिल, यहाँ यांसारखे चित्रपट आले. या चित्रपटांमुळे मी एकाच साच्यात अडकलो नाही.”
View this post on Instagram
जिमीचा जन्म एका शीख कुटुंबात झाला. त्याचं मूळ नाव जसजीत सिंह गिल असं आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने केस कापण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे त्याच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. “तेव्हा तुम्ही लहान असता आणि तुमच्या हातून काही चुका घडतात. मीसुद्धा काही चुका केल्या. काही चुकांची शिक्षा मला खूप मोठी मिळाली”, असं जिमीने सांगितलं.
आईवडिलांनी अबोला धरण्यापेक्षा वेदनादायी गोष्ट कोणतीच असू शकत नाही, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. याविषयी तो पुढे म्हणाला, “माझे आईवडील माझ्याशी दीड वर्षापर्यंत बोलत नव्हते. कदाचित माझ्यासाठी तीच मोठी शिक्षा होती. मी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करेन असा विचारसुद्धा त्यावेळी माझ्या मनात फिरकला नव्हता. पण माझ्या नशिबात ते लिहिलेलं होतं. म्हणूनच सर्वकाही जुळून आलं. तुम्ही त्याला चूक म्हणा, घटना म्हणा किंवा अपघात म्हणा.. काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे मी या इंडस्ट्रीत पोहोचलो.” एका जुन्या मुलाखतीत जिमीने सांगितलं होतं की वयाच्या 18 वर्षांपर्यंत त्याने पगडी बांधली होती. पण केस कापल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी दीड वर्षापर्यंत अबोला धरला होता.