Kajol | काजोलने वैतागून केली शिवीगाळ; नेमकी कोणावर भडकली अभिनेत्री?
काजोल आणि अजय देवगणची मुलगी निसा देवगण सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याआधीच ती प्रकाशझोतात आली आहे.
मुंबई : अभिनेत्री काजोल तिच्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. माध्यमांसमोर किंवा पापाराझींसमोर नेहमीच काजोलला मोकळेपणे व्यक्त होताना पाहिलं गेलं. मात्र अनेकदा त्यावरून काजोलला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतीच तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये दोन पोस्ट लिहिल्या आहेत. हे पोस्ट वाचल्यानंतर नेटकरीसुद्धा संभ्रमात पडले आहेत. काजोलने या पोस्टद्वारे तिचा राग व्यक्त केला आहे, हे स्पष्ट जाणवतंय. मात्र तिने हा राग कोणाविषयी व्यक्त केला आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
काजोलची पहिली पोस्ट-
‘जे लोक त्यांच्या डोळ्यांनी प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘गुडबाय’ हा शब्द असतो. पण जे त्यांच्या हृदयाने आणि मनाने प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘विभक्त’ नावाची कोणतीच गोष्ट नसते- रुमी’, असं तिने पहिल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
काजोलची दुसरी पोस्ट-
काजोलच्या या दुसऱ्या पोस्टची सुरुवातच #truthoftheday (आजच्या दिवसाचं सत्य) या हॅशटॅगने केली आहे. पुढे तिने लिहिलंय, ‘स्री असो किंवा पुरुष.. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भित्रेपणा असतो. (पुढे शिवीचाही वापर) त्यांची किंमत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या लिंगापुढे (स्त्री-पुरुष) आंधळे होऊ नये हीच खरी युक्ती आहे.’ या पोस्टच्या अखेरीस तिने #thishithome असा हॅशटॅग वापरला आहे. काजोलने तिच्या या पोस्टमधून कोणावर निशाणा साधला आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
काजोलने नुकताच तिच्या मुलीचा 20 वा वाढदिवस साजरा केला. निसा देवगणच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. काजोल आणि अजय देवगणची मुलगी निसा देवगण सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याआधीच ती प्रकाशझोतात आली आहे.
ट्रोलिंगविषयी अजय काय म्हणाला?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजयने ट्रोलिंगविषयी वक्तव्य केलं होतं. “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावते की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मी म्हणतो की तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते”, असं तो म्हणाला.
“मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो. मला तर कधी कधी त्यांनी काय लिहिलंय हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे मला आता त्या गोष्टींचा काहीच त्रास होत नाही”, असंही तो पुढे म्हणाला होता.