अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटाबद्दल कल्की व्यक्त; म्हणाली “राहायला घरही..”
अभिनेत्री कल्की कोचलीन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अनुराग कश्यपला घटस्फोट दिल्यानंतर मुंबईत भाड्याने राहायला घरही मिळत नव्हतं, असा खुलासा तिने केला.
अभिनेत्री कल्की कोचलीनने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2015 मध्ये कल्की आणि अनुरागने घटस्फोट घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कल्की तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अनुरागला घटस्फोट दिल्यानंतर मुंबईत भाडेतत्त्वावर राहण्यासाठी घर मिळत नव्हतं, असा खुलासा तिने केला. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘ये जवानी है दिवानी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करूनही मुंबईत भाड्याने राहण्यासाठी घर मिळत नव्हतं, अशी तक्रार कल्कीने केली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असूनही घर का मिळत नाही, यामागील कारणांचा विचार केला असता कदाचित ‘सिंगल मदर’ असल्यामुळे लोक घर नाकारत असल्याचा अंदाज तिला आला.
“मी प्रसिद्ध आहे. तुम्हाला माझ्यासोबत सेल्फी काढायचे असतात पण मला राहण्यासाठी घर द्यायचं नसतं”, अशी भावना त्यावेळी कल्कीच्या मनात निर्माण झाली होती. जवळपास दोन महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपने खुलासा केला होता की ज्या घरात तो सध्या राहतोय, ते खरंतर कल्कीने शोधलं होतं. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्याने घराविषयी सांगितलं होतं. “मी लग्नानंतर या घरात राहायला आलो होतो. कल्कीनेच हे घर शोधलं होतं. दिग्दर्शक शशांका घोष यांच्या मालकीचं हे घर होतं. आम्ही त्यांच्याकडून हे घर विकत घेतलं. त्यांनी या घरात अनेक दिग्ग्जांना आमंत्रित केलं होतं”, असं अनुरागने सांगितलं होतं.
View this post on Instagram
कल्कीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘गोल्डफिश’ या चित्रपटात झळकली होती. डिमेन्शियाशी संघर्ष करणारी आई आणि तिचं मुलीसोबतचं नातं अशी या चित्रपटाची कथा आहे. समिक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय. कल्की लवकरच ‘हर स्टोरी’ आणि ‘नेसिप्प्याया’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे अनुराग कश्यप सध्या ‘निशांची’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लखनऊमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. अनुरागला घटस्फोट दिल्यानंतर कल्कीने गाय हर्शबर्गशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.