‘कलयुग’च्या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण; घटस्फोट, करिअर उद्ध्वस्त अन् नैराश्याच्या गर्तेत..
'कलयुग' या चित्रपटातील 'जिया धडक धडक' हे गाणं तुफान गाजलं. अभिनेत्री स्माइली सुरी आणि कुणाल खेमू यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. त्याच अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण झालं आहे. स्माइली ही आलिया भट्ट, इमरान हाश्मी, पूजा भट्ट यांची चुलत बहीण आहे.
मुंबई : 29 डिसेंबर 2023 | ‘कलयुग’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये कुणाल खेमू आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री स्माइली सुरी तुम्हाला आठवतेय का? या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तुझे देख देख सोना..’ हे कुणाल आणि तिच्यावर चित्रित झालेलं गाणं तुफान गाजलं होतं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. या चित्रपटानंतर स्माइली इतरही चांगल्या भूमिका साकारेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र ‘कलयुग’नंतर ती पुन्हा कुठे दिसलीच नाही. स्माइलीच्या खासगी आयुष्यातही बरेच चढउतार आले. तिला लग्नात अपयश आलं, करिअर उद्ध्वस्त झालं आणि या सर्व गोष्टींमुळे ती नैराश्याच्या गर्तेत अडकली होती.
स्माइलीचे आताचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला ओळखणं खूप कठीण जातं. ‘कलयुग’मध्ये रेणुकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हीच का, असा प्रश्न पडतो. स्माइली इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिथे तिने काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. काही व्हिडीओंमध्ये तिचं वजनही खूप वाढल्याचं पहायला मिळतंय. 30 एप्रिल 1977 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्माइली सुरीने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलयुग’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यानंतर तिने 2011 मध्ये क्रॅकर्स, क्रुक, यह मेरा दिल, तिसरी आंख यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
स्माइलीने छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. 2015 मध्ये तिने ‘नच बलिए’ या डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर ती ‘जोधा अकबर’ या मालिकेतही झळकली होती. दिग्दर्शक मोहीत सुरी हा स्माइलीचा भाऊ आहे. ‘कलयुग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहितनेच केलं होतं. ती महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची भाचीसुद्धा आहे. त्यामुळे पूजा भट्ट, आलिया भट्ट, शाहीन भट्ट या तिच्या चुलत बहिणी आहेत.
View this post on Instagram
स्माइलीने तिच्या साल्सा डान्स प्रशिक्षक विनीत बंगेराशी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर ‘नच बलिए 7’मध्ये दोघांनी एकत्र भाग घेतला होता. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच विनीत आणि स्माइली विभक्त झाले. एका मुलाखतीत स्माइली तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली होती. “विनीत हा माझा साल्सा टीचर होता आणि मी त्याच्या प्रेमात पडले होते. डान्सच्या आवडीमुळेच आमची चांगली मैत्री झाली होती. पण त्या आकर्षणाला आम्ही प्रेम समजून बसलो. लग्नानंतर आम्हाला समजलं की हा निर्णय चुकीचा होता. एकाच छताखाली एकत्र राहिल्यानंतर आम्ही दोघं खूप वेगळे आहोत, असं जाणवलं. माझ्या कुटुंबीयांनीही आमचं नातं वाचवण्याचे खूप प्रयत्न केले होते. मात्र डिसेंबर 2016 मध्ये विनीत मला सोडून गेला आणि परतलाच नाही. आमचं नातं पुढे जाऊ शकत नाही हे कदाचित त्याला आधीच समजलं होतं”, असं तिने सांगितलं होतं.