प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्त्यावर आढळला मृतदेह; काम मिळत नसल्याने भीक मागण्याची आली होती वेळ
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीचं निधन दहा वर्षांपूर्वी झालं होतं. तेव्हापासून पोटाची भूक भागवण्यासाठी ते रस्त्यावर भीक मागत होते. मोहन यांनी काम मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश न मिळाल्याने बेरोजगारीमुळे त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती.
तमिळनाडू | 5 ऑगस्ट 2023 : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहन हे मदुराई शहरातील थिरुपरनकुंद्रम परिसरात रस्त्यावर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले. मोहन यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला असून या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही काळापासून ते आर्थिक विवंचनेत होते. इतकंच नाही तर हातात काम नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. मोहन हे तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी कमल हासनसोबतच इतरही मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं होतं.
मोहन यांनी ‘नान कडुवुल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये काम मिळणं बंद झाल्याने ते मदुराईतील थिरुपरनकुंद्रम याठिकाणी राहायला गेले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीचं निधन दहा वर्षांपूर्वी झालं होतं. तेव्हापासून पोटाची भूक भागवण्यासाठी ते रस्त्यावर भीक मागत होते. मोहन यांनी काम मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश न मिळाल्याने बेरोजगारीमुळे त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती.
मोहन यांचं निधन 31 जुलै रोजी झालं होतं. स्थानिक लोकांना त्यांचा मृतदेह रस्त्यावरच आढळला होता. पोलिसांना याबद्दलची सूचना दिल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मोहन यांचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या पश्चात दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मोहन यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी निधनाबद्दलची माहिती दिली आहे.
मोहन यांनी 1989 मध्ये ‘अप्पोर्वा सगोधरंगल’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात कमल हासन यांच्या खास मित्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. या चित्रपटाला काही प्रमुख भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं होतं. इतर भाषांमध्येही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मोहन यांनी कॉमेडी अभिनेते म्हणून बऱ्याच भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकेत झळकले होते.