Atique Ahmed | ‘तुम्ही रडणं बंद करा, माझ्यापर्यंत आवाज येतोय’, अतिक अहमदच्या हत्येनंतर कंगनाची पोस्ट चर्चेत
गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला.
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटवर तिने लिहिलंय, ‘धर्म केवळ त्याच्या पालनाने स्थापित होत नाही तर अधार्मिकतेच्या नाशाने होतो.’ कंगनाने तिच्या पोस्टमध्ये अहमद किंवा अशर्रफ यांच्या हत्येचा थेट उल्लेख केला नाही. मात्र या पोस्टमध्ये तिने योगी आदित्यनाथ आणि धर्म-अर्धमाचा उल्लेख केल्याने तिचं लक्ष्य कुठे आहे, याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. अतिकवर विविध प्रकारचे सुमारे 100 गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी इथलं पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेल पाल हत्येप्रकरणात पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्यावेळी हल्ला झाला.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘शास्त्र म्हणतं की धर्माची स्थापना फक्त धर्माचं पालन करून होत नाही, तर अधर्माच्या नाशाने होते. अयोध्येत तपस्वी राजांची परंपरा आहे ज्यांनी भारताचा उद्धार केला. जय श्री राम.’ या पोस्टमध्ये कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर व्हायरल मीमची ओळ शेअर केली आहे. ‘तुम्ही रडणं बंद करा, माझ्यापर्यंत आवाज येतोय’, अशी ही ओळ आहे.