आधी मारला टोमणा, आता विनेश फोगटसाठी कंगनाने लिहिली अशी पोस्ट; सोशल मीडियावर चर्चा
विनेश फोगटला अपात्र ठरवण्यावरून देशात राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं याबाबत जागतिक कुस्तीगीर संघटनेकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे.
अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरंच राहिलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशने अंतिम फेरीच्या दिवशी, बुधवारी वजन अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. मंगळवारी उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी तिच्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तिला शुभेच्छा तर दिल्याच होत्या, पण त्याचसोबतच कुस्तीगीरांच्या आंदोलनाचा उल्लेख करत टोमणादेखील मारला होता. त्यानंतर आता विनेश अपात्र ठरल्यानंतर कंगना यांनी तिच्यासाठी आणखी एक पोस्ट लिहिली आहे.
कंगना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भारताचा नकाशा आणि विनेशचा अॅनिमेटेड फोटो पहायला मिळतोय. भारताच्या नकाश्यातून तिरंगा फडकतोय आणि विनेश उदास बसलेली दिसत आहे. यावर कंगना यांनी लिहिलंय, ‘रडू नकोस विनेश, संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.’ यानंतर आणखी एका स्टोरीमध्ये विनेश रुग्णालयातील बेडवर बसलेली दिसत आहे आणि त्यावर कंगना यांनी लिहिलंय, ‘सिंहीण!’
कंगनाचा आधी टोमणा
उपांत्य फेरीत विनेशने विजय मिळवल्यानंतर कंगना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विनेश फोगटचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यांनी लिहिलं होतं, ‘भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगटने एकेकाळी कुस्तीगीरांच्या आंदोलनात भाग घेतला होता आणि तिथे तिने ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा दिल्या होत्या. तरीसुद्धा तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी, सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सोयीसुविधा देण्यात आल्या. लोकशाहीची आणि महान नेत्याचं हे सौंदर्य आहे.’
गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. कुस्तीपटूंनी या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. त्यावेळी विनेश फोगटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. तिने वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने तिने मोदींविरोधात घोषणाबाजीही केली होती.