Karan Johar |’तू गे आहेस का?’ युजरच्या प्रश्नावर करण जोहरने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा
करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबतच जया बच्चन धर्मेंद्र, शबाना आझमी आणि इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.
मुंबई : आजवर बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी आपण समलैंगिक असल्याचं उघडपणे मान्य केलं. तर इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींबद्दल असं म्हटलं जातं की ते समलिंगी आहेत. परंतु त्यांनी ते कधीच उघडपणे स्वीकारलं नाही. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरदेखील त्यापैकीच एक आहे. करण जोहरच्या लैंगिकतेवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले आणि अनेकदा त्यालाही याबाबत विचारलं गेलं. आता पुन्हा एकदा हाच सवाल करणला विचारला गेला आहे. नुकतीच त्याने ‘थ्रेड्स’ या ॲपवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनअंतर्गत चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने त्याला विचारलं की ‘तू खरंच गे आहेस का?’ यावर करण जोहरने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. यासोबतच करणने त्याला आयुष्यात सर्वांत जास्त कशाचा पश्चात्ताप होतो हेदेखील सांगितलं.
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर करणने ‘थ्रेड्स’ या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांशी गप्पा मारणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्याने चाहत्यांना त्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यास सांगितलं. याच संधीचा फायदा घेत एका युजरने करणला विचारलं, ‘तू हे आहेस का?’ त्यावर करणनेही त्याला प्रतिप्रश्न केला की, ‘तू इंटरेस्टेड आहेस का?’
View this post on Instagram
या प्रश्नानंतर आणखी एका युजरने करणला विचारलं की, ‘तुला सर्वांत जास्त कोणत्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो?’ याचं उत्तर देताना करणने लिहिलं, ‘मला माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही याचा सर्वाधिक पश्चात्ताप होतो.’ यावेळी करणला असंही विचारण्यात आलं की, त्याचा धर्मा प्रॉडक्शन भविष्यात शाहरुख खानसोबत काम करणार का आणि तो सलमान खानसोबत चित्रपट करणार आहे का? या दोन्ही प्रश्नांवर करणने मोकळेपणे उत्तरं दिली नाही.
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जवळपास सहा वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबतच जया बच्चन धर्मेंद्र, शबाना आझमी आणि इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.