Kartik Aaryan: कार्तिक आर्यनने परेश रावल यांच्या कानशिलात लगावली; नेमकं काय घडलं?
'शहजादा'च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन दमदार ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. मात्र त्यातील एक सीन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क बसला.
मुंबई: ‘भुलभुलैय्या 2’ या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये कार्तिकसोबत क्रिती सनॉन आणि परेश रावल यांच्याही भूमिका आहेत. ‘शहजादा’च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन दमदार ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. मात्र त्यातील एक सीन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क बसला. हा सीन होता कार्तिक आर्यन ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कानशिलात लगावतानाचा.
‘शहजादा’च्या ट्रेलरमध्ये कार्तिकला समजतं की तो परेश रावल यांचा मुलगा नाही आणि त्याचे वडील त्याच्याशी खोटं बोलतात. अशातच कार्तिक हा परेश रावल यांच्या जोरदार कानाखाली वाजवताना दिसतो. शहजादा या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान कार्तिकला याविषयी प्रश्न विचारण्यात आला.
सीन शूट करतानाचा अनुभव सांगताना कार्तिक म्हणाला, “हा खूप चांगला प्रश्न आहे. त्यावरून मी जरा गोंधळलो होतो. मात्र परेशजी यांच्या मदतीने मी तो सीन शूट करू शकलो. हा सीन मी कसा शूट करेन, या विचाराने मी संभ्रमात होतो. आम्ही चित्रपटात खरोखरच कानाखाली नाही मारत, पण या सीनमध्ये प्रेक्षकांना खरंच असं वाटलं पाहिजे की मी त्यांच्या कानाखाली वाजवली आहे. असं करताना कधीकधी चुकून मारसुद्धा लागतो. मात्र दोन कलाकारांमध्ये विश्वास हवा आणि हा सर्व टायमिंगचा खेळ आहे. परेशजी तर कॉमिक टायमिंगचे किंग आहेत.”
“हा सीन शूट करण्याआधी त्यांनी मला म्हटलं होतं, तू टेन्शन नको घेऊस, जोरदार कानाखाली मार. चित्रपटाच्या मूडमध्ये तो सीन तसा शूट झाला पाहिजे. त्यांनी असं म्हटल्यानंतर माझ्यावरील ताण कमी झाला. हा सीन या चित्रपटातील हायलाइटपैकी एक आहे”, असं त्याने पुढे सांगितलं.
‘शहजादा’ हा साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलो’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कार्तिक यामध्ये अभिनयासोबतच चित्रपटाची निर्मितीदेखील करणार असल्याचं म्हटलं जात आहे. निर्माता म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असेल. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.