KGF Chapter 3 मध्ये श्रीनिधी परत येणार? अभिनेत्रीने दिलं उत्तर
रॉकीची रीना परत येणार? केजीएफ: चाप्टर 3 बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
मुंबई- ‘केजीएफ चाप्टर 2’ हा या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. कमाईचे नवे विक्रम या कन्नड चित्रपटाने रचले. केवळ कन्नड भाषेतच नाही तर हिंदीतही केजीएफ 2 ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षकांना केजीएफ- चाप्टर 3 ची (KGF: Chapter 3) प्रचंड उत्सुकता आहे. तिसऱ्या भागात यशसोबत अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) झळकणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण दुसऱ्या भागाच्या शेवटी रीनाचा (श्रीनिधी) मृत्यू दाखवण्यात येतो. त्यावर आता खुद्द श्रीनिधीने उत्तर दिलं आहे.
केजीएफ- चाप्टर 2 चा क्लायमॅक्स हा प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण करतो. अधिरा आणि रॉकी (संजय दत्त आणि यश) यांच्यातील वैर संपलं का, रीनाचा खरंच मृत्यू झाला का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात. श्रीनिधीने नुकतंच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला एका चाहत्याने केजीएफ 3 बद्दल प्रश्न विचारला.
‘केजीएफ 3 मध्ये तुझी भूमिका असेल का? आम्हाला तिसऱ्या भागात रीनाची भूमिका परत हवी आहे,’ असा प्रश्न एक युजर विचारतो. त्यावर उत्तर देताना श्रीनिधी लिहिते, ‘हाहाहा.. पण मला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. आपल्याला मुख्य माणसाला या प्रश्नाचं उत्तर विचारावं लागेल, आणि ती व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत आहे, पीएन’.
श्रीनिधीने लिहिलेल्या पीएनचा अर्थ प्रशांत नील असा होतो. प्रशांत हा केजीएफ चाप्टर 1 आणि 2 चा दिग्दर्शक आहे. तोच तिसऱ्या भागाचंही दिग्दर्शन करणार आहे.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत तिसऱ्या भागाविषयी म्हणाला होता, “चाप्टर 3 ची नक्कीच शक्यता आहे. लोकांना केजीएफचं विश्व आणि त्यातील भूमिका आवडल्या आहेत. तिसरा चाप्टर कधी येईल माहीत नाही, पण आम्ही त्यावर काम करत आहोत.”