वालावलकरांचो थोरलो जावई.. ‘कोकण हार्टेड गर्ल’चं धूमधडाक्यात लग्न
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक अंकिता वालावलकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न करून तिने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. धूमधडाक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अंकिताने अर्थातच तिच्या लग्नसोहळ्यासाठी कोकण हेच ठिकाण निवडलंय. कोकणात अत्यंत ग्रँड पद्धतीने हे लग्न पार पडलं आणि त्याला बिग बॉस मराठीच्या काही सदस्यांचीही उपस्थिती पहायला मिळाली. वालावलकरांचो थोरलो जावई.. असं कॅप्शन देत अंकिताने या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवल्यानंतर अंकिताने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. तेव्हा बिग बॉसच्या घरातच तिने लग्नाची बातमी जाहीर केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने कुणाल भगतसोबतचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याची सर्वांशी ओळख करून दिली होती. तेव्हापासून अंकिता आणि कुणालच्या लग्नाची उत्सुकता अनेकांमध्ये होती. ‘कुणाल तुला माझ्यासारखी मुलगी बायको म्हणून मिळाली यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन, तू नशिबवान आहेस’ अशी पोस्ट लिहित तिने लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.




View this post on Instagram
अंकिताचा पती कुणाल हा संगीत दिग्दर्शक असून ‘आनंदवारी’ या म्युझिक अल्बमसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. कुणालने ‘येक नंबर’ या चित्रपटातील गाण्यांचंही संगीत दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकांनाही त्याने संगीत दिलंय. अंकिताच्या यशाची कहाणी अनेकांना थक्क करणारी आहे. कोकणातून मुंबईत येऊन तिने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर इन्फ्लुएन्सर विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. जसजशी तिला लोकप्रियता मिळाली, तसतसं तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. बिग बॉसच्या घरातही अंकिताने अत्यंत हिंमतीने ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास केला होता.