जॅकी श्रॉफची नक्कल परवानगीशिवाय केली तर 2 कोटींचा दंड; कृष्णा अभिषेकच्या पत्नीने दिलं उत्तर
प्रत्येक अभिनेत्याचं एक खास व्यक्तीमत्त्व असतं. अनेकदा विनोदांमध्ये, मीम्समध्ये त्यांचा वापर करून खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चुकीचा उपयोग होत असल्याचं पाहून याआधी इतरही कलाकारांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आपलं नाव, पसंत आणि खासकरून भिडू या शब्दाच्या वापराविरोधात ही याचिका होती. जॅकी श्रॉफची चालण्या-बोलण्याची पद्धत, हावभाव, आवाज आणि इतर स्टाइल हे इतरांपेक्षा अत्यंत अनोखे आहेत. मात्र विविध शोज किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचा सर्रास गैरवापर केला जात असल्याची गोष्ट त्याच्या निदर्शनास आली. म्हणूनच आपल्या गोष्टींची नक्कल परवानगीशिवाय होऊ नये, यासाठी त्याने कोर्टात धाव घेतली. मात्र जॅकी श्रॉफची नक्कल करण्यावर आणि ‘भिडू’ हा शब्द वापरण्यावरच बंदी आणली तर अनेक कॉमेडियन्सचं काय होणार, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकला अनेकदा जॅकीची नक्कल केल्याचं पाहिलं गेलंय. त्यामुळे जॅक श्रॉफच्या या याचिकेनंतर अनेकांनी कृष्णा आणि त्याच्या पत्नीला मेसेज केले. त्यावर आता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिने प्रतिक्रिया दिली आहे.
कश्मिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जॅकी आणि कृष्णाचा फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘ज्यांनी आम्हाला मेसेज करून नाराजी व्यक्त केली, त्या सर्व चाहत्यांना मी हे सांगू इच्छिते की, एखाद्या व्यक्तीची नक्कल करणं म्हणजे त्या व्यक्तीची खुशामत किंवा प्रशंसा करण्याचा सर्वोच्च प्रकार आहे. हे तुम्ही समजून घ्या. कृष्णाचं जग्गू दादावर खूप प्रेम आहे.’ कश्मीराच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
फॅशन डिझायनर रोहित वर्माने लिहिलं, ‘माझ्या मते कृष्णा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याला जग्गू दादाच्या रुपात पाहून मला खूप आवडतं. प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होतं.’ तर अभिनेता बख्तियार इराणीने म्हटलंय, ‘त्याने सुरुवात केली आणि नंतर त्याला लार्जर दॅन लाइफ बनवलं. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, कृष्णाने जग्गू दादाकडे पाहण्याकडचा नवा दृष्टीकोन दिला आहे.’
14 मे रोजी दाखल केलेल्या याचिकेत जॅकीने मागणी केली आहे की, जर त्याचं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्दाला वापर परवानगीशिवाय केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी आणि दोन कोटी रुपयांचा दंड ठोठवावा. या याचिकेवरून हायकोर्टाने सध्या सर्व आरोपींविरोधात समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे MEITY ला (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) कोर्टाने निर्देश दिले आहेत की त्यांनी असे सर्व लिंक्स सोशल मीडियावरून काढून टाकावेत, जिथे जॅकी श्रॉफच्या खासगी हक्कांचं उल्लंघन केलं असेल.
जॅकीचे वडील प्रवीण आनंद यांनी कोर्टात सांगितलं की असं करून अभिनेत्याची प्रतिमा मलिन केली जात आहे. आक्षेपार्ह मीम्समध्ये जॅकीच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. त्याचसोबत त्यांच्या आवाजाचाही गैरवापर केला जातोय. म्हणूनच जॅकीने हायकोर्टात त्याविरोधात याचिका दाखल केली आहे आणि आपल्या अधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. जॅकी, जग्गू दादा आणि भिडू हे शब्द कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापर करण्यापासून रोखलं जावं, असंही त्यांनी म्हटलंय.