“मी 8 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी..”; अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
खुशबू सुंदर या 2021 मध्ये रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' चित्रपटात झळकल्या होत्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या थलपती विजयच्या 'वारिसू' या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
मुंबई : अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर या दोन्ही क्षेत्रात बऱ्यापैकी सक्रिय आहेत. महिलांच्या हक्कांबाबत ठाम मतं मांडणाऱ्या आणि आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या खुशबू यांनी अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा पदभार स्वीकारला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बालपणातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
वडिलांकडून झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेबद्दल त्या मोकळेपणे व्यक्त झाल्या. “मी आठ वर्षांची असल्यापासून वडिलांनी माझं लैंगिक शोषण करणं सुरू केलं होतं. आपल्या पत्नीला, मुलांना मारणं आणि मुलीचं लैंगिक शोषण करणं हा माझा अधिकारच आहे, असं माझ्या वडिलांना वाटायचं. जेव्हा एखाद्या लहान मुलगा किंवा मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा ती घटना त्यांच्या मनावर आयुष्यभर परिणाम करते”, असं त्या म्हणाल्या.
याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “माझी आईने सर्वांत अपमानकारक लग्नाचा सामना केला. माझ्या आईला मारणं, आमच्यावर हात उचलणं आणि एकुलत्या एका मुलीचं लैंगिक शोषण करणं हा माझा अधिकारच आहे, असं वडिलांना वाटायचं. मी 8 वर्षांची असताना माझं लैंगिक शोषण सुरू झालं होतं. जेव्हा मी 15 वर्षांची झाले, तेव्हा त्यांच्याविरोधात बोलण्याचं साहस माझ्यात आलं होतं.”
“माझी आई माझ्यावर विश्वास करेल का नाही, असा मला प्रश्न होता. कारण मी अशा परिस्थितीत लहानाची मोठी झाले, जिथे पतीला देवासमान मानलं जायचं. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी मी विचार केला की हे आता पुरे झालं. मी वडिलांविरोधात गेले आणि आवाज उठवला. या घटनेनंतर ते आम्हाला सोडून गेले. त्यावेळी पुढच्या वेळचं जेवण कुठून येणार, हेसुद्धा आम्हाला माहित नव्हतं”, अशा शब्दांत त्यांनी दु:ख मांडलं.
खुशबू सुंदर या 2021 मध्ये रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटात झळकल्या होत्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या थलपती विजयच्या ‘वारिसू’ या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
कोण आहेत खुशबू सुंदर?
खुशबू सुंदर यांनी मेरी जंग, जानू, तन बदन, दिवाना मुझसा नही अशा मोजक्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. मेरी जंग चित्रपटात जावेद जाफ्रीसोबत ‘बोल बेबी बोल’ या गाण्यात त्या झळकल्या होत्या. खुशबू यांनी प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत, तसेच कन्नड, तेलुगू, मल्याळम चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
2010 मध्ये खुशबू यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. करुणानिधींच्या उपस्थितीत त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला. मात्र चार वर्षांतच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 2014 मध्ये खुशबू यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. मात्र त्यानंतर खुशबू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.