Lucky Ali | ‘इब्राहिमपासून आला ब्राह्मण शब्द’; लकी अली यांच्या पोस्टवरून वाद, अखेर मागितली माफी
लकी अली यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट त्यांनी आता डिलिट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ब्राह्मण हे नाव ब्रह्मापासून आलं आहे, तर ब्रह्मा हा शब्द अब्रामपासून आला आहे. हे अब्राहम किंवा इब्राहिमपासून येतं.
मुंबई | गायक लकी अली यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून विविध मुद्द्यांवर मोकळेपणे आपली मतं मांडतात. लकी अली यांच्या नुकत्याच एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. फेसबुकवरील त्यांच्या एका पोस्टमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग झाल्यानंतर अखेर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. लकी अली यांनी त्यांच्या डिलिट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की ‘ब्राह्मण हे नाव इब्राहिम’वरून आलं आहे.
आता नव्या पोस्टमध्ये लकी अली यांनी स्पष्ट केलं की त्यांचा उद्देश फक्त समाजातील विविध घटकांमधील लोकांना एकत्र करणे आहे आणि कोणामध्ये राग किंवा दु:ख निर्माण करणे नाही. आपल्या या माफीनाम्यात त्यांनी लिहिलं, ‘माझ्या पोस्टवरून झालेल्या वादाची मला जाणीव आहे. माझा कोणालाही त्रास देण्याचा किंवा कोणाच्या मनात रागाची भावना आणण्याचा हेतू नव्हता. पण हे योग्य नाही हे माझ्या लक्षात आलं. मला जे म्हणायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. यापुढे मी जे पोस्ट लिहिन त्याबद्दल अधिक जागरूक राहीन. माझ्या बोलण्याने अनेक हिंदू बंधू – भगिनींच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.’
‘ब्राह्मण हा शब्द इब्राहिमपासून आला’
लकी अली यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट त्यांनी आता डिलिट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ब्राह्मण हे नाव ब्रह्मापासून आलं आहे, तर ब्रह्मा हा शब्द अब्रामपासून आला आहे. हे अब्राहम किंवा इब्राहिमपासून येतं. ब्राह्मण हे एक वंश आहे. तर इब्राहिम, अलैहिस्सलाम हे सर्व राष्ट्रांचे जनक आहेत. मग प्रत्येकजण विनाकारण वाद घालत आणि भांडण करत का बसले आहेत?
लकी अली हे सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहेत. मात्र ते भारतात आणि परदेशात शोज करत असतात. त्यांची गाणी आजही तरुणाईमध्ये आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.