हीच ती खुर्ची आणि टेबल.. आंबेडकरांबद्दल गौरव मोरेची भावनिक पोस्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता गौरव मोरेनं सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये तो एका खुर्ची आणि टेबलासमोर उभं असल्याचं पहायला मिळतंय.
आज संपूर्ण देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहिले आहेत. यात कलाकारांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर गौरव मोरे यानेसुद्धा सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो एका खुर्ची आणि टेबलासमोर उभं असल्याचं पहायला मिळतंय. ही कोणती सर्वसामान्य खुर्ची नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये याच खुर्चीवर बसून अभ्यास केला होता. त्याठिकाणी गौरवने दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती. तोच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
गौरव मोरेची पोस्ट-
‘हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता. त्या पवित्र वास्तुला 2022 मध्ये भेट दिली होती. आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. थँक यू बाबासाहेब, तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
गौरव लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेले, दलितांच्या हक्कांसाठी लढलेले, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखो लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे.
या चित्रपटात गौरवसोबतच प्रसाद ओक, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यांसारख्या नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केलं आहे.