शूटिंगदरम्यान वीस फूट उंचावरून पडून स्टंटमॅनचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
शूटिंगदरम्यान मोठा अपघात; ॲक्शन सीन शूट करणारा स्टंटमॅन 20 फूटांवरून कोसळला अन्..
चेन्नई: एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. ॲक्शन सीनचं शूटिंग करताना सेटवर स्टंटमॅनचा मृत्यू झाला. एस सुरेश असं त्या स्टंटमॅनचं नाव असून ते 54 वर्षांचे होते. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. वेत्री मारन या चित्रपटाचं दिगदर्शन करत होते. चित्रपटातील एका ॲक्शन सीनचं शूटिंग करताना स्टंटमन सुरेश हे दुर्घटनेचे शिकार झाले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांच्या विदूथलाई या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर मोठा अपघात झाला. तामिळनडूमधील वांदालूर याठिकाणी शूटिंग सुरू होतं. सुरेश हे सहाय्यक म्हणून मुख्य स्टंट दिग्दर्शकांसोबत स्टंट करत होते. सीननुसार भव्य सेट उभारण्यात आला होता. सेटवर तोडक्या मोडक्या ट्रेनचे भाग आणून ठेवले होते. सुरेशसुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सेटवर शूटिंगसाठी उपस्थित होते. एका दोरीला बांधल्यानंतर त्यांना उंचावरून उडी मारायचा स्टंट करायचा होता.
20 फूट उंचावरून पडला स्टंटमॅन
रिपोर्ट्सनुसार सुरेश यांना एका दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधण्यात आलं होतं. मात्र जशी शूटिंग सुरू झाली, तशी दोरी तुटली आणि सुरेश उंचावरून खाली पडले. सुरेश जवळपास 20 फूट उंचावरून पडले. या दुर्घटनेनंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
सुरेश हे गेल्या 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत होते. विदुथलई या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग दोन भागांमध्ये पूर्ण होणार होतं. मात्र या दुर्घटनेमुळे शूटिंगला थांबवण्यात आलं आहे.