प्रसिद्ध अभिनेत्रीचा वडिलांवर गंभीर आरोप; घुसखोरी करून कुटुंबीयांना दिली जीवे मारण्याची धमकी
विजयकुमार यांनी पत्नीला घटस्फोट दिला असून त्या मुलगी अर्थना आणि 85 वर्षीय आईसोबत राहतात. पत्नी आणि मुलीला धमकी दिल्याप्रकरणीही विजयकुमार यांच्याविरोधात खटला सुरू आहे. अर्थना ही विजयकुमार आणि बिनु डॅनियल यांची मुलगी आहे.
केरळ : सेम्मा, शेलॉक, मुधूगौव यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अर्थना बिनु हिने तिच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. वडील विजयकुमार यांच्यावर तिने घुसखोरी आणि धमकीचा आरोप केल आहे. मंगळवारी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अर्थनाचे वडील आणि अभिनेते विजयकुमार हे तिच्या घरात घुसखोरी करताना दिसत आहेत. आईला घटस्फोट दिल्यानंतरही सतत कुटुंबीयांना त्रास देत असल्याचं तिने या व्हिडीओच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘वडिलांनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकी दिली. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करूनही कोणतीच कारवाई झाली नाही,’ असंही तिने म्हटलंय.
या पोस्टमध्ये अर्थनाने लिहिलं, ‘आज ते आमच्या घराच्या कम्पाऊंडवरून आत शिरले. दार आतून बंद होतं म्हणून ते खिडकीतून आम्हाला धमकी देत होते. माझी बहीण आणि आजीला जीवे मारण्याची धमकी देतानाचं ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला गेले. त्यांनी मलासुद्धा धमकी दिली. मी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवावं असं ते म्हणाले आणि जर त्यांचं ऐकलं नाही तर ते कोणत्याही थराला जातील. जर मला अभिनय करायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्याच चित्रपटांमध्ये मी काम करावं, असं ते म्हणाले. ते सतत खिडकीबाहेरून ओरडत होते. ते माझ्या आजीवर आरोप करत होते.’
‘हे सर्व तेव्हा घडलं जेव्हा मी आणि माझ्या आईने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याविरोधात न्यायालयात खटलासुद्धा सुरू आहे. घुसखोरी करणं, माझ्या कामाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण करणं, तसंच माझ्या आईच्या कामाच्या ठिकाणी आणि बहिणीच्या शैक्षणिक संस्थेत जाऊन तिथे वाद घालणं यावरून आम्ही तक्रार केली होती’, असं तिने स्पष्ट केलं.
विजयकुमार यांनी अर्थनाविरोधातही खटला दाखल केला आहे. तिने चित्रपटांमध्ये काम करू नये यासाठी त्यांनी हा खटला दाखल केला. “मी माझ्या इच्छेनुसार चित्रपटांमध्ये काम करतेय. मला अभिनय नेहमीपासूनच आवडलंय आणि माझं आरोग्य ठीक असेपर्यंत मी हेच काम करेन. जेव्हा कधी मी मल्याळम चित्रपटात भूमिका साकारली, तेव्हा त्यांनी माझ्याविरोधात केस दाखल केली. माझ्या शेलॉक या चित्रपटाच्या वेळीही त्यांनी असाच वाद घातला होता. त्यावेळी मला कायदेशीर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं की मी माझ्या इच्छेनुसारच चित्रपटात काम करतेय”, असं अर्थनाने सांगितलं.
विजयकुमार यांनी पत्नीला घटस्फोट दिला असून त्या मुलगी अर्थना आणि 85 वर्षीय आईसोबत राहतात. पत्नी आणि मुलीला धमकी दिल्याप्रकरणीही विजयकुमार यांच्याविरोधात खटला सुरू आहे. अर्थना ही विजयकुमार आणि बिनु डॅनियल यांची मुलगी आहे. 2016 मध्ये तिने ‘सितम्मा अंदालू रामय्या सित्रालू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.