स्वप्न अधुरंच राहिलं; करिअरमधल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी दिग्दर्शकाचं निधन
26 फेब्रुवारी रोजी रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जोसेफ यांना न्युमोनिया झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र हेपेटाइटिसमुळे त्यांचं निधन झालं.
केरळ : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून वाईट बातमी समोर येत आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्दर्शक जोसेफ मनू जेम्स यांचं निधन झालं आहे. 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते 31 वर्षांचे होते. केरळमधील एर्नाकुलम इथल्या अलुवाजवळील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 26 फेब्रुवारी रोजी रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जोसेफ यांना न्युमोनिया झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र हेपेटाइटिसमुळे त्यांचं निधन झालं.
जोसेफ मनू जेम्स हे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत होते. त्यांच्या करिअरमधील पहिलावहिला चित्रपट ‘नॅन्सी रानी’ हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता. येत्या काही दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र त्याआधीच जोसेफ यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिग्दर्शक जोसेफ हे उत्तम अभिनेतेसुद्धा होते. 2004 मध्ये त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. मल्याळमशिवाय कन्नड चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
View this post on Instagram
जोसेफ यांच्या नॅन्सी रानी या चित्रपटात अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोन्ही कलाकारांनी जोसेफच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘तुझ्या आत्म्याला शांती मिळो, तुझ्यासोबत असं घडायला पाहिजे नव्हतं’, अशी पोस्ट अहानाने लिहिली आहे.
जोसेफसोबत नॅन्सी रानी चित्रपटात काम करणाऱ्या अजू वर्गिसनेही भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘खूपच लवकर निघून गेलास भावा, प्रार्थना’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.