आई-पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून प्रसिद्ध गायकाचं अपहरण
मे महिन्यापासून मणिपूरमध्ये सतत तणावाचं वातावरण आहे. अशातच तिथल्या एका स्थानिक गायकाचं काही बंदूकधाऱ्यांनी अपहरण केल्याची बातमी समोर येत आहे. अखु चिंगंगबम असं त्या गायकाचं नाव असून त्याच्या आई आणि पत्नीला बंदुकाची धाक दाखवून अपहरण करण्यात आलंय.
मणिपूर : 30 डिसेंबर 2023 | गेल्या काही काळापासून मणिपूर सतत वादविवादात अडकला आहे. कधी तिथून हिंसेची बातमी समोर येते तर कधी जातीय मतभेदाच्या घटना घडतात. महिलांच्या शोषणाच्या घटनेमुळे मणिपूर चर्चेत होतं. आता तिथल्या एका स्थानिक गीतकार आणि गायकाचं अपहरण केल्याची बातमी समोर येत आहे. अखु चिंगंगबम असं या गायकाचं नाव आहे. सशस्त्र गुंडांनी त्याचं अपहरण केलं. अखू हा इंफाळच्या पूर्वेकडील खुराई इथला आहे. ‘इंफाळ टॉकीज’ या रॉक बँडचा तो संस्थापक आहे. अपहरणानंतर त्याला त्याच्या घरापासून जवळपास 20 किमी दूर सोडण्यात आलं. अखूच्या पत्नी आणि आईला बंदुकीच्या धाकावर धरल्यानंतर बंदूकधाऱ्यांनी त्याचं अपहरण केलं होतं. नंतर त्याला इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील एका ठिकाणी कोणतीही इजा न पोहोचवता सोडून दिलं.
“अखू चिंगंगबम या व्यक्तीचं अज्ञातांनी अपहरण केलं होतं आणि नंतर त्याला कोणतीही इजा न करता सोडण्यात आलं”, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे कोणतीही खंडणी मागितली नाही किंवा त्याच्या कुटुंबीयांनी याविरोधात तक्रार दाखल केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली. अखू हा फक्त गायक आणि गीतकार नसून तो सामाजिक कार्यकर्तासुद्धा आहे. इंफाळमध्ये त्याने अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्याविषयी तो सोशल मीडियाद्वारे सतत माहिती देत असतो. यावर्षी मे महिन्यापासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी यांच्यात जातीय हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 160 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
View this post on Instagram
अखू चिंगंगबमचं खरं नाव रोनिद चिंगंगबम आहे. एमटीव्ही इंडियाच्या ‘The Dewarists’ या म्युझिकल टीव्ही शोमध्ये त्याने भाग घेतला होता. याआधी अखू त्याच्या अपघातामुळेही चर्चेत आला होता. 2016 मध्ये ‘वर्ल्ड म्युझिक डे’ला झालेल्या अपघातात त्याच्या कानाला मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याची श्रवण क्षमता कमी झाली होती.