Prashant Damle | प्रशांत दामले यांना मातृशोक; आई विजया दामले यांचं निधन
मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांच्या आईचं बुधवारी सकाळी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई विजया दामले यांचं आज (बुधवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रशांत दामले हे काही कामानिमित्त मुंबईबाहेर होते. तेव्हा त्यांना आईच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विजया दामले यांच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत दुपारी 4 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पाडले जातील.
प्रशांत दामले हे नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत दामले हे त्यांच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी जवळपास महिनाभर अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. येत्या 8 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असा महिनाभर हा दौरा होता. कोणतंही नाटक असो, ते प्रशांत दामले यांच्या नावावर चालणारच, अशी खात्री असते. नाट्यक्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी 12 हजार 500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठला होता.
निर्मिती क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. प्रशांत फॅन फाऊंडेशन ही त्यांची स्वत:ची संस्था आहे. या संस्थेद्वारे ते अनेक सामाजिक कार्य करतात. महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी त्यांनी एक लाख रुपये दिले होते. प्रशांत दामले हे गेली तीन दशके मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत.
View this post on Instagram
सुरुवातीला नाटक हा छंद आणि पैशांसाठी नोकरी हे गणित प्रशांत दामले यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याही डोक्यात पक्कं होतं. मात्र आई आणि पत्नी यांच्या पाठिंब्यामुळेच 1992 मध्ये त्यांनी पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. रंगभूमीवरील या यशाचं श्रेय ते आई आणि पत्नीला देतात.