मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला
प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी 'धर्मवीर 2' चित्रपटाच्या पोस्टर लाँच कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याने या चित्रपटाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी काम केल्याचं वक्तव्य पिळगावकर यांनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने खरंच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा मनात अधिराज्य गाजवलं. आता या ‘धर्मवीर’ सिनेमाचा नवा भाग म्हणजेच ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित, प्रसाद ओकच्या अभिन्याने नटलेला धर्मावीर २ चा पोस्टर लाँच कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडचा अभिनेता बॉबी देओलची विशेष उपस्थिती बघायला मिळाली. या कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुक्ता आणखी शिगेला पोहोचली आहे.
अभिनेता मंगेश देसाई यांनी सुरुवातीला भूमिका मांडली. “एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेऊन दोन वर्ष पूर्ण झाली. ते पुढील दहा वर्ष मुख्यमंत्री राहावेत. अशी बाप्पा चरणी प्रार्थना करतो. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं सिनेमाचं नाव असेल. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असेल. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत 9 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे”, असं मंगेश देसाई यावेळी म्हणाले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरवर आहे.
सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?
“साहेब, तुम्ही आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मी मंगेशला विचारतोय, मुख्यमंत्री म्हणून दहाच वर्ष का? पुढे का नाही? मुख्यमंत्री साहेब तुम्ही या चित्रपटात काम केलंय, असं कळलं. तुमचं सिनेसृष्टीत स्वागत”, असं सचिन पिळगावकर म्हणाले. सचिन पिळगावकर यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटात खरंच काम केलंय का? त्यांनी खरंच काम केलं असेल तर ते सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसतील का? असे प्रश्नांचा सस्पेन्स वाढवला आहे.
महेश कोठारे काय म्हणाले.
ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीदेखील यावेळी भूमिका मांडली. “पहिला सिनेमा ही एक कमाल कलाकृती होती . आम्हाला वाटलं की अभिनेता क्षितीज हाच शिंदे साहेब आहे, असं वाटत होतं. २ वर्ष झाली, खरं तर तुमचं काम हे १० वर्षाचं काम केलं आहे. तुम्ही २० वर्ष मुख्यमंत्री राहा आणि महाराष्ट्र सुपरहीट काम करा. येताना मी कोस्टल रोडने आलो किती भारी काम केलं आहे”, असं महेश कोठारे म्हणाले.
अशोक सराफ काय म्हणाले?
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंगही झाले आहे. पहिल्या धर्मवीरने एक वेगळी पसंती प्रेक्षकांनी दिली होती. आता धर्मवीर २ ची उत्सुकता आहे. हा सिनेमाही पहिल्या सिनेमा सारखाच चांगला होईल”, असं अशोक सराफ म्हणाले.