Priya Berde : दोन वर्षापूर्वी राजकारणात एन्ट्री, आता भाजप प्रवेश, प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी का सोडली?
मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांच्यासह आणखी काही कलाकारांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलाय.
चैतन्य अशोक गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांच्यासह आणखी काही कलाकारांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलाय. विशेष म्हणजे प्रिया बेर्डे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करत राजकारणात एन्ट्री मारली होती. जवळपास दोन वर्ष राष्ट्रवादीत काम केल्यानंतर अचानक प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश का केला? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी कोरोना काळात अनेक कलाकारांना मदतीचा हात दिला होता. सिनेसृष्टीतील कलाकारांना केलेल्या मदतीमुळे प्रिया बेर्डे त्यावेळी चर्चेतही आल्या होत्या.
नाशिकमध्ये आज राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान प्रिया बेर्डे यांच्यासह आणखी काही इतर कलाकारांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
प्रिया बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश झाला.
प्रिया बेर्डे यांनी दोन वर्षांपूर्वी 7 जुलै 2020 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता.
महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस असल्याचं प्रिया बेर्डे यावेळी म्हणाल्या होत्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचं त्या म्हणाल्या होत्या. पण अवघ्या दोन वर्षात त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा प्रिया बेर्डे काय म्हणाल्या होत्या?
“आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीची निवड का केली, असा प्रश्न मला विचारला जातो. तर शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने 3 हजार लोक कलावंतांना प्रत्येकी 3000 रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता.” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या होत्या.
“मला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्याविषयी तळमळ वाटते. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन. मी स्वतःला नेता म्हणणार नाही. कारण आम्ही सगळे जण एकत्र काम करणार आहोत. अभिनय सुरुच राहील, निर्माती म्हणूनही काम करत आहे, ते चालू ठेवेन” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं होतं.