महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात, महिला आयोगाने धाडलं आक्षेपाचं पत्र
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.
मुंबई : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील काही सीन आणि अल्वपयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, अशी मागणी करणारं पत्र महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठवलं आहे.महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात, महिला आयोगाने धाडलं आक्षेपाचं पत्र
महेश मांजरेकारांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!
महेश मांजरेकरांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील काही सीनवरुन हा वाद सुरु झाला आहे. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली आहे. तसंच हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा, अशी मागणीही महिला आयोगाने केली आहे.
चित्रपटात नेमकं काय?
ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. उद्या म्हणजेच १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
महिला आयोगाने पत्रात काय म्हटलंय?
“वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा” या आगामी मराठी चित्रपट जो 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होतोय, त्यासंदर्भात भारतीय स्त्री शक्ती, महाराष्ट्राकडून राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार प्राप्त झाली आहे. १४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलांवर आक्षेपार्ह पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आहे आणि म्हणूनच अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांसाठी अशी लैंगिक दृश्ये उपलब्ध आहेत, याचा महिला आयोग निषेध करतो. अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्यासाठी आणि चित्रपटाचा ट्रेलर आणि लैंगिक दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लैंगिक दृश्ये उघडपणे प्रसारित होणार नाहीत याची खात्री करण्यास आयोगाने सांगितले आहे. या पत्राची प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे. आयोगाला या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत कळवावे, असंही पत्राच्या शेवटी महिला आयोगाने अधोरेकित केलं आहे.
संबंधित बातम्या