Chandramukhi Movie : “Amruta Khanvilkar पेक्षा मी चांगली चंद्रमुखी साकारली असती”, Mansi Naikचा दावा
विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चंद्रमुखी ही भूमिका अमृता खानविलकर साकारत आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी अनेकांनामध्ये उत्सुकता आहे. पण आता अभिनेत्री मानसी नाईक तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. "मी चांगल्या प्रकारे ही भूमिका केली असती", असं मानसी म्हणाली आहे.
मुंबई : विश्वास पाटील (Vishawas Patil) यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी‘ (Chandramukhi) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमातील ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी कोण असा हे मध्यंतरी खूप जास्त चर्चेत होतं. ही भूमिका आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) करणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. तसंच या सिनेमातील चंद्रमुखी कोण असणार याविषयीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. चंद्रमुखी ही भूमिका अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) साकारत आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी अनेकांनामध्ये उत्सुकता आहे. पण आता अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. “मी चांगल्या प्रकारे ही भूमिका केली असती”, असं मानसी म्हणाली आहे.
मानसी नाईक काय म्हणाली?
एका मुलाखतीदरम्यान मानसी चंद्रमुखी या भूमिकेविषयी मत मांडलं. यावेळी तिला ही भूमिका तू केली असती का? असं विचारलं असता तिनं उत्तर दिलं. “कदाचित मला हा चित्रपट ऑफर करण्यात आला असेल किंवा मला काय होणार याची माहिती असेल. त्यामुळे मला कदाचित त्यासाठी विचारणा करण्यात आली असावी. मी याबद्दल काहीही नाही बोललं तरच चांगलं आहे. पण माझ्या या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहेत. त्या चित्रपटाचे लेखन करण्यापासून ते शुटींग करणारी मंडळी या सर्वांसाठी मी फार खूश आहे. पण मला असं वाटतं की मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती”, असं मानसी म्हणाली आहे.
मानसी नाईक कोण आहे?
मानसी नाईक ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचं ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गाणं खूप पसंत केलं गेलं. ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या सिनेमांमध्ये तिने काम केलंय. शिवाय ‘बाई वाड्यावर या’ हे तिचं गाणं अनेकांच्या पसंतीला उतरलं. शिवाय ती डान्सही उत्तम करते. तिच्या डान्सचा मोठा चाहता वर्ग आहे.
अमृता भूमिकेविषयी काय म्हणते?
आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारत आहे. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे. अनेक दिवसांपासूनच्या ‘चंद्रमुखी’च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला आहे. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.’’
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित, अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. ‘नटरंग’नंतर बऱ्याच काळानंतर अजय -अतुल यांचे दमदार संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली असून ‘चंद्रमुखी’ येत्या 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या